श्रीनगर, दि.१६ – माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पुन्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू नये, असे मत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाह यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले. काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांची निवड जवळपास निश्चित आहे, असेही ते म्हणाले.
कलाम यांनी निवडणूक लढवू नये – उमर अब्दुल्लाह
यापूर्वी कलाम यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी ठरली होती. राष्ट्रपती म्हणून त्यांनी लोकांची मने जिंकली होती. तथापि, या पदावर ते निवडून येण्याची शक्यता अजिबात नसल्याने, त्यांनी ही शक्यता आजमावून पाहू नये, असेही अब्दुल्लाह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय अर्थमंत्री आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार असलेल्या प्रणव मुखर्जी यांना मिळणारा पाठिंबा लक्षात घेता, त्यांची निवड निश्चित आहे. मुखर्जी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अब्दुल्लाह यांनी काल टवीट करून त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांची कारकीर्द उत्तम पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला. उमर अब्दुल्लाह यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने त्यांना यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला आहे.
