दिल्लीत राष्ट्रपती निवडणुकीचे राजकारण सुरू असतानाच काँग्रेस श्रेष्ठींचे लक्ष आंध्र प्रदेशाकडे होते. आपण जगन मोहन रेड्डीचे खच्चीकरण करतोय पण त्याचा काही लाभ आपल्याला मिळेल का असा प्रश्न त्यांना पडला होता पण तिथल्या पोटनिवडणुकीचे निकाल येत होते तसे काँग्रेस नेत्यांना हादरे बसत होते. विधानसभेच्या १८ जागांवर पोटनिवडणूक झाली. काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला. १७ जागांवर काँग्रेसचे उमेदवार सपशेल पराभूत झाले. वायएसआर काँग्रेस पक्षाने १५ जागा जिंकल्या. एक जागा काँग्रेसला, एक जागा तेलंगण राष्ट्र समितीला तर एक जागा तेलुगु देसमला मिळाली. लोकसभेची नेल्लोर ही जागा जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षानेच जिकली.
काँग्रेस पक्षाने पोट निवडणुकीचा प्रचार जोरावर असताना जगन मोहन यांना अटकेत टाकले होते पण त्यांच्या आईने बहिणीने प्रचाराची धुरा सांभाळली आणि घवघवीत यश मिळवले. दिवंगत मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर जगनमोहन रेड्डी यांनी हे यश मिळवले. खरे तर आंध्र प्रदेश हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. १९८३ साली त्याला तेलुगु देसमने धक्का दिला. पण राजशेखर रेड्डी यांनी पुन्हा स्थान मिळवले. आता पुन्हा काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. कारण राज्याच्या तिन्ही भागांत काँग्रेसची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. २००९ साली काँग्रेसला केंद्रातली सत्ता मिळाली. त्या सत्तेचा मुख्य आधार आंध्र प्रदेशच होता. कारण या राज्याने तब्बल ३६ काँग्रेस खासदार निवडून दिले होते.
यावेळी काँग्रेसची वाताहत झाली आहे. तेलंगण राज्य निर्मितीच्या आंदोलनामुळे तेलंगणात काँग्रेसचा प्रभाव ओसरला आहे, तर उर्वरित आंध्र प्रदेशामध्ये काँग्रेसमध्ये वाय.एस.आर. काँग्रेसच्या रुपाने फाटाफूट झालेली आहे. वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी काँग्रेसला चांगले नेतृत्व दिले होते. आता त्या तोडीचा नेता काँग्रेसकडे नाही. गेल्या मार्च महिन्यामध्ये तेलंगणात झालेल्या विधानसभेच्या सात पोट निवडणुकांपैकी एकाही निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला नव्हता. या १८ मतदारसंघातल्या परीक्षेतही काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले आहेच. परंतु राज्याच्या अन्य दोन भागांमध्ये म्हणजे रायलसीमा आणि किनारी प्रदेश या दोन भागामध्येही काँग्रेसचा प्रभाव उतरणीला लागला आहे. हे या निवडणुकीतून दिसून आले. जगनमोहन रेड्डी यांनी वाय.एस.आर. काँग्रेसची स्थापना करून काँग्रेसच्या वर्चस्वाला नेमका किती मोठा धक्का दिलेला आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट झालेले आहे.
स्वतः जगनमोहन रेड्डी यांनी कडप्पा लोकसभा मतदारसंघात आणि त्यांच्या मातोश्रींनी एका विधानसभा मतदारसंघात चांगले यश मिळवले होते. पण या पलीकडे त्यांच्या पक्षाचे बळ कधी दिसलेले नव्हते. ते त्यांनी दाखवून दिले आहे. पोटनिवडणुका होत असलेल्या १८ मतदारसंघातील एक मतदारसंघ तेलंगणातला आहे तर नऊ मतदारसंघ रायलसीमा भागातले आणि आठ मतदारसंघ सागर किनारी प्रदेशातील आहेत. म्हणजे राज्याच्या तिन्ही भागातील जनमताची चाचणी आता झालेली आहे. या १८ पैकी १६ जागा वाय.एस.आर. काँग्रेसच्याच होत्या त्यातली एक जागा या पक्षाला गमवावी लागली. बाकीच्या १५ जागा पदरात पाडून घेऊन वायएसआर काँग्रेसने आपला करिष्मा दाखवला.. १६ जागा आपण नक्की जिकणार असा विश्वास या पक्षाच्या नेत्यांना वाटत होता. तो वृथा ठरला नाही. हा काँग्रेससाठी मोठा धोक्याचा इशारा ठरला आहे. लोकसभेची नेल्लोरची जागाही काँग्रेसेने गमावली आहे. तिथले वाय एसआर काँग्रेसचे उमेदवार राजमोहन रेड्डी यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री टी. सुब्बारामी रेड्डी यांचा पराभव केला आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेसच्या १६ आमदारांनी विधानसभेतल्या एका मतदानामध्ये पक्षाचा आदेश झुगारून विरोधात मतदान केले. त्यामुळे या १६ जणांवर पक्षांतर विरोधी कायद्याखाली कारवाई करून त्यांचे आमदारपद रद्द करण्यात आले. ते १६ आमदार नंतर जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वाय.एस.आर. काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे या १६ जागा रिकाम्या झाल्या होत्या. हे सोळा आमदार बाहेर पडल्याने काँग्रेसच्या बहुमताला धोका निर्माण झाला होता पण ती कसर भरून काढण्यासाठी काँग्रेसने चित्रपट अभिनेते चिरंजीवी यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. त्यामुळे बहुमत टिकले पण चिरंजीवी यांचे राजकारण विसर्जित झाले. एनटीआर प्रमाणे अभिनेतेपदाचा वापर करून राजकारणात नाव काढण्याचे त्यांचे मनोरथ उधळले गेले आहे आता त्यांचे नावही निघणार नाही. राज्यातल्या जातीय ध्रुविकरणातही काँग्रेसचा खातमा झाला आहे. कारण आजवर काँग्रेसला साथ देणारा रेड्डी समाज वायएसआर काँग्रेसच्या मागे झुकला आह. दक्षिणेत काँग्रेसचे पूर्वी चांगलेच वर्चस्व होते पण आता तामिळनाडूपाठोपाठ आंध्रातलेही वर्चस्व कमी होत आहे. येती निवडणूक काँग्रेससाठी अवघड आहे.