पाकमध्ये २६-११ च्या सुनावणीला मुहूर्त मिळेना!

इस्लामाबाद,दि.१६ – मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यातील सात पाकिस्तानी संशयितांची सुनावणी, आज (शनिवार) लागोपाठ दुसर्‍या आठवड्यातही स्थगित करण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीसाठी एकही न्यायाधीश उपलब्ध होऊ न शकल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या सात संशयितांमध्ये लष्कर-ए-तैयबाचा स्वयंघोषित कमांडर झाकीऊर रहमान लख्वी याचाही समावेश आहे.

यापूर्वी ५ जून रोजी झालेल्या सुनावणीनंतर, दहशतवादविरोधी न्यायालयातील न्यायाधीश शाहीर रफीक यांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेले हे पद अद्याप भरण्यातच आलेले नाही. आता ही सुनावणी २३ जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे, असे न्यायालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.

लखवी याच्यासह सात संशयितांविरुद्ध २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचणे, आर्थिक मदत करणे आणि हल्ला करणे या आरोपांवरुन खटला दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते.

न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये विलंब होत असल्याबद्दल लख्वी याचे वकील ख्वाजा हॅरिस अहमद यांनी नाराजी प्रकट केली आहे. या प्रकरणाची सुनावणी २००९ मध्ये सुरू झाल्यापासून, पाच न्यायाधीश बदलले आहेत. या खटल्याचे कामकाज रावळपिंडीतील अदियाला तुरंगात बंद दाराआड होत असून, आतापर्यंत सुनावणीमध्ये फारशी प्रगती झालेली नाही.

मुंबई हल्ल्याच्या सुनावणीबरोबरच या न्यायालयात बेनझीर भुट्टो यांच्या हत्येच्या खटल्याचीही सुनावणी चालू आहे. या खटल्याचीही ५ जूनपासून कोणतीही सुनावणी झालेली नाही.

Leave a Comment