डिझेल मोटारींवरील करवाढ तूर्तास अशक्य – सियाम

मुंबई, दि. १५ – डिझेलचा वापर कमी करण्यसाठी पेट्रोलियममंत्री एस. जयपाल रेड्डी यांनी डिझेल कारवर अतिरिक्त २.५५ लाख रूपयांपर्यंत कर लावण्याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयापुढे ठेवला आहे. मात्र, अवजड मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अशक्य असल्याचे वाहन उद्योग संघटना सियाम‘ने म्हटले आहे.

डिझेल कारचा वापर कमी झाल्यास सरकारवरील वाढत्या अनुदानाचा भार कमी होईल, असे पेट्रोलियम मंत्रालयाचे म्हणणे आहे. गेल्याच आठवडयात रेड्डी यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून डिझेल कारवर १.७० लाख रूपये ते २.५५ लाख रूपये या दरम्यान अतिरिक्त कर आकारण्याची मागणी केली होती. मात्र अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) चे वरिष्ठ संचालक सुगातो सेन यांनी म्हटले आहे.

त्यामुळे तूर्तास तरी अशा प्रकारची दरवाढ अशक्य आहे. गेल्याच आठवडयात अवजड उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव अंबुज शर्मा यांनी पेट्रोलियम मंत्रालयाच्या प्रस्तावास विरोध करताना, या विषयावर अर्थ मंत्रालयास पत्र लिहिणार असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment