गुटखाबंदीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे

मुंबई दि.१५ – दिवसेनदिवस राज्यातील तरूण पिढी पानमसाला आणि गुटख्याच्या विळख्यात जात असल्याने या पिढीची या व्यसनांतून सुटका करण्यासाठी राज्यात गुटखाबंदीबद्दलचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी रवाना करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यापूर्वी २००२ सालीही राज्यात पानमसाला आणि गुटखाबंदी करण्यात आली होती मात्र गुटखा उत्पादकांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचा निर्णय राज्यसरकार विरोधात लागला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ व्या वर्धापनदिन सोहोळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात पानमसाला व गुटखाबंदी करण्यात येईल अशी घोषणा केली होती. केवळ घोषणेवर न थांबता त्यांनी त्यासंबंधीची पावलेही तातडीने उचलली. त्यासाठी या उत्पादनांतून राज्याला मिळणार्‍या १०० कोटीं रूपयांच्या महसूलावरही पाणी सोडण्याची तयारी त्यांनी दाखविली आणि अन्न औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांना या बंदीसंबंधाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले असे समजते.

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनीही कालच मंत्रालयात संबंधित अधिकार्‍यांची बैठक बोलावून गुटखाबंदीचा प्रस्ताव तयार केला आणि तो मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी पाठविला असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्राने २००६ सालात अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यात ४४ जे या नियमाचा समावेश केला असून त्याअन्वये कोणत्याही पदार्थात निकोटिन वा तंबाखू वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. हा नवा कायदा राज्यात सप्टेंबर २०११ साली अस्तित्वात आला असल्याने आता राज्य सरकारला या पदार्थांवर बंदी घालणे शक्य होईल असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment