आषाढी वारीवर पाणीटंचाईचे संकट

पंढरपूर, दि. १५ – सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून या धरणाच्या मृतसाठ्यातील १६ टी. एम. सी. पाण्याचा वापर झाला आहे. नजीकच्या काळात पाऊस पडला नाही तर धरणाच्या पाण्याची पातळी आणखी खालावणार असल्याने येणार्‍या आषाढी वारीवर पाणीटंचाईचे संकट येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून जिल्ह्यात २७० टँकरद्वारे वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाला तरी टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने सोलापूर, बार्शी व इंदापूर भागातील सुमारे ७१ पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या आहेत. उजनीतून पाणी सोडण्यास स्थगिती दिली असल्यामुळे आषाढीयात्रा कालावधीत भाविकांना चंद्रभागेतील स्नानापासून वंचित रहावे लागणार आहे.

सध्या धरणात ४८८.५३ मीटर म्हणजे १३६०.८० द.ल.घ.मी. असून उपयुक्त साठ्यात पाणी ४३४.८६ द.ल.घ.मी. पाणी वापरण्यात आले आहे. सध्या उजनीची पाण्याची पातळी २८ टक्के आहे.

Leave a Comment