फेसबुकमुळे हिरे चोरणार्‍याला बेड्या

मुंबई, १५ – सध्याची तरुणाई फेसबुक, ट्विटर, ऑर्कुट यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटसमध्ये रमत असते. या साईटसचे काही तोटे आहेत, पण बर्‍याचदा त्यांचा फायदाही होतो. यायाच प्रत्यय मुंबईत झालेल्या एका चोरीच्या निमित्ताने आला.

मुंबईतील एका व्यापार्‍याच्या दुकानातून लाखोंचे हिरे चोरून पसार झालेल्या चोरट्या नोकराला पोलिसांनी अटक केली. संजय शहा या हिर्‍यांच्या व्यापार्‍याकडे काम करणार्‍या करण पटेलची नियत फिरली आणि हिर्‍यांसह पळून गेला. विशेष म्हणजे फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटमुळे करण पटेलला बेड्या घालण्यात पोलिस यशस्वी झाले.
फेसबुकवर मुलींशी मैत्री करणे हेच करण पटेलला भारी पडले. हिरे व्यापारी संजय शहा यांना करणला फेसबुकवर चॅटिंग करण्याची सवय आहे हे माहित होते. शहा यांनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी मुलीचे बनावट प्रोफाईल तयार केले. फेसबुकवर करणशी काही दिवस चॅटिंग केले. त्यानंतर एक दिवस भेटण्याची वेळ निश्चित केली आणि करण पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.

करण पटेलला पोलिसांनी याआधीही चोरीच्या एका प्रकरणात २००९ साली अटक केली होती. न्यायालयाने करण पटेलला १५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment