प्राध्यापकांना छान संधी

देशामध्ये तांत्रिक शिक्षणाला एकदमच गती आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), तंत्रनिकेतन (पॉलीटेक्निक) आणि अभियांत्रिकी महाविद्यालये यांच्या बरोबरच संगणक आणि माहिती तंत्रज्ञान यांचे शिक्षण देणार्‍या अनेक संस्था नित्य उदयाला येत आहेत. या संस्था एवढ्या गतीने सुरू होत आहेत की, त्यांच्या गतीने त्या त्या संस्थांतले शिक्षक आणि प्राध्यापक मात्र तयार होत नाहीत. त्यामुळे यासर्व शिक्षण संस्थांत शिक्षकांची फार वानवा आहे. तंत्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची उद्योगामध्ये किंवा इतरत्र कोठे तरी नोकरी मिळावी अशी इच्छा असते. परंतु हेतुपुरस्सरपणे अध्यापनाच्या क्षेत्राकडे वळणारे तंत्रज्ञ फारच कमी आहेत. तेव्हा या रोजगार संधीचा विचार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच केला पाहिजे.

महाराष्ट्रात स्वातंत्र्यापासून विनाअनुदानित संस्था सुरू होईपर्यंतच्या काळात निवडक ठिकाणीच अभियांत्रिकी महाविद्यालये होती. १९८३ साली विनाअनुदानित संस्था सुरू झाल्या. त्याच्या आधी महाराष्ट्रात दहा अभियांत्रिकी महाविद्यालये होती. आता ती संख्या ४०० झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाविद्यालये काढताना मुळात देशाला अभियंत्यांची गरज किती याचा तरी विचार केलेलाच नाही. पण एवढ्या महाविद्यालयात शिकवायला प्राध्यापक कोठून मिळतील याचाही विचार केलेला नाही. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तीन लाख प्राध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत. या क्षत्रातले सर्वाधिक टंचाई अभियांत्रिकी महाविद्यालयात आहे. देशभरातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दीड लाख प्राध्यापकांची गरज आहे. तेव्हा बी.ई. झालेल्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक होण्याचा निश्‍चित हेतू डोळ्यासमोर ठेवून एम.ई. कडे वळले पाहिजे. एम.ई. आणि एम.टेक्. झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकीची उत्तम संधी असते. त्याचबरोबर बी.ई. झालेल्या पदवीधरांना तंत्रनिकेतन आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात चांगली संधी मिळू शकते. अद्याप तरी शिक्षकांची टंचाई असल्यामुळे या संस्थांतील प्राध्यापकांची निवड करण्यासाठी सरकारने अजून कडक अटी घातलेल्या नाहीत. अजूनही बी.एड., डी.एड्., नेट-सेट परीक्षा, पीएच.डी., एम्.फील अशा अटी घातलेल्या नाहीत. अशा अटी घालत बसल्यास प्राध्यापक मिळणारच नाहीत हे सरकारला माहीत आहे. म्हणूनच तंत्र शिक्षणातील पदव्या आणि पदव्युत्तर पदव्या मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन अध्यापनाच्या क्षेत्रात उतरले पाहिजे.

तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात प्राध्यापकांच्या टंचाईची जी अवस्था आहे ती तशीच वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आहे. अजून तरी देशामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या अभियांत्रिकी महाविद्यालयाप्रमाणे झपाट्याने वाढत नाही. पण तरी सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची तीव्र टंचाई आहे. याही क्षेत्रातील प्राध्यापकांना चांगले वेतन मिळते आणि शैक्षणिक पात्रतेच्या अटी फारशा कडक नाहीत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्राध्यापकांची मागेल तेवढा पगार देऊन आणि वाट्टेल त्या सवलती देऊन पळवा पळवी सुरू असलेली दिसते.

Leave a Comment