…अन् म्हैस झाली कोर्टापुढे हजर!

कोटा,  दि. १५ – एखाद्या आरोपी किंवा साक्षीदाराला न्यायालयापुढे हजर होताना तुम्ही पाहिले असेल. मात्र एका म्हशीला कोर्टापुढे हजर करण्याची अजब घटना राजस्थानातील कोटा येथे नुकतीच घडली. न्यायालयापुढे हजर झालेल्या म्हशीला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

हिरालाल गुजर या पशुपालकाची म्हैस गेल्या वर्षी चोरीला गेली होती. हिरालालच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवल सिंह या स्थानिक नागरिकाच्या घरातून म्हैस जप्त करून हिरालालकडे सुपूर्द केली. या प्रकरणात नवलला पोलिसांनी अटक केली होती. नवल सिंह याने मात्र म्हैस चोरीचा आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणाची सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. चोरीला गेलेली म्हैस ओळखण्यासाठी तिला न्यायालयाच्या आवारात आणले जावे अशी नवल सिंहच्या वकिलाने न्यायाधीशाकडे विनंती केली होती. त्यानुसार कोटा न्यायालयात हिरालालला म्हशीसह हजर राहण्याचे आदेश दिले होते.

म्हशीला न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश
म्हशीला ओळखण्यासाठी तिला न्यायालयापुढे हजर करण्याची आम्ही न्यायालयाला विनंती केली होती, असे नवल सिंहचा वकील मेघराज सिंह याने सांगितले. त्यानुसार न्यायालयाने आदेश दिला होता. या म्हशीसोबत एक वगार सुद्धा होती. परंतु वगार कुठे आहे त्याचा पत्ता नाही, असे हिरालालने सांगितले. हिरालाल आणि त्याचा मुलगा शिवराज यांचा मंगळवारी कोर्टात जबाब नोंदवण्यात आला.

`आम्ही म्हशीला घेऊन पाच किलोमीटर चालत न्यायालयात पोचलो. सुनावणीची वेळ येईपर्यंत म्हैस झाडाला बांधून ठेवली होती. आवारात जमलेली गर्दी आणि नव्या वातावरणात ती थोडी गोंधळली होती.’  अशी माहिती शिवराजन याने दिली.

राजस्थानात पाच कोटी गुरे असून यात म्हशींची संख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. ही दुभती जनावरे असल्याने त्यांची मागणी जास्त असते.

Leave a Comment