मेट्रो लांबणीवर, मोनो रेल व फ्री वे वर्षाअखेर सुरू

मुंबई, दि.१ – वडाळा ते चेंबूर ही साडेनऊ किलोमीटर लांबीची मोनोरेल आणि ऑरेंज गेट ते चेंबूर हा सुमारे नऊ किलोमीटरचा लांबीचा ईस्टर्न फ्री वे हे दोन्ही वाहतूक प्रकल्प या वर्षाअखेरीस वाहतुकीस खुले होतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. जमिनीची अत्यंत कमी उपलब्धता आणि दाट लोकवस्ती असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे हे एकमेव उदाहरण आहे, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. तथापि मेट्रोरेल चे काम मार्च २०१३ पर्यंत लांबण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या वाहतूक विषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पाहणी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंख्यमंत्र्यांचे मलबार हिल येथील निवासस्थान वर्षा येथून मिनीबसमधून सुरू झालेल्या या पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्र्यांसमवेत मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल अस्थाना, मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यू.पी.एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे सचिव आशिषकुमार सिंह, डॉ.नितीन करीर, अतिरिक्त महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, पोलिस आयुक्त अरूप पटनायक आदी उपस्थित होते.

ऑरेंजगेट येथून सुरूवात झालेल्या या पाहणी दौर्‍यात मुख्यमंत्र्यांनी इस्टर्न फ्री वे येथून पांजरपोळ लिंक रोड, वडाळा भक्ती पार्क येथे असलेल्या मोनोरेल स्टेशनची पाहणी करून तेथील कामाची माहिती घेतली. त्यानंतर बीएआरसी येथील डोंगराखालून जाणार्‍या चार पदरी रस्ते असणार्‍या बोगद्याची पाहणी केली. पुढे घाटकोपर स्टेशनजवळील मेट्रो रेल्वे स्थानकाची पाहणी केली. ही सर्व पाहणी करताना त्यांनी मिनीबसचा वापर करून त्यांच्या समवेत असलेल्या अधिकार्‍यांकडून कामांची माहिती घेतली.

एमएमआरडीए तर्फे सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, पूर्व उपनगरातील वाहतुकीस चालना देणारी ही कामे पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करावे, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्‍यांना यावेळी केल्या.
ईस्टर्न फ्री वे प्रमाणेच मोनो रेलचे काम २०१३ जानेवारी पर्यंत पूर्ण होईल, अशी खात्री देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे कामही मार्च २०१३ पर्यंत पूर्णत्वास येईल.

मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याबद्दल चव्हाण म्हणाले की, दुसर्‍या टप्प्यातील कार डेपोच्या जमिनीवरील खारफुटीच्या जंगलाचे स्थलांतर करण्यास केंद्रीय पर्यावरण खात्याची मान्यता अद्याप मिळालेली नाही. दुसरा टप्पा पूर्ण करण्यामध्ये ही मोठी अडचण असून हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत एमएमआरडीएच्या वतीने जी कामे करण्यात आली त्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment