महाराष्ट्रातील सर्व तुरूंगांचे सुरक्षा ऑडीट होणार

पुणे/मुंबई दि.१३- पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती तुरूंगात नुकत्याच झालेल्या कातील सादिकीच्या भयंकर खुनानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व तुरूंगांचे सिक्युरिटी ऑडीट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गृह विभागाच्या मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांनी सांगितले. पुण्याच्या तुरूंगात घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी हे ऑडीट करण्यात येत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की सर्व तुरूंगांना सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येत आहेत.
 
येरवडा जेलमध्ये ८ जून रोजी कातील सादिकी याचा शरद मोहोळ आणि आलोक भालेराव या दोघा कैद्यांनी खून केला. कातील हा पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी होता. याच स्फोटाच्या चौकशीसाठी मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने त्याला चौकशीसाठी २०११ साली मुंबईत आणले होते. अर्थात तुरूंगातच खून होण्याची ही पहिलीच घटना नाही. २००२ सालातही गँगस्टर छोटा राजनचा जवळचा सहकारी ओ.पी.सिंग याची नाशिक तुरूंगात अन्य कैद्यांनीच हत्या केली होती.

सिक्युरिटी ऑडीट हे या खूनप्रकरणांपुरतेच मर्यादित नाही असे सांगून गाडगीळ म्हणाल्या की अन्य तुरूंगातही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कांही त्रुटी आहेत का आणि असतील तर त्या कोणत्या याचाही तपास यावेळी घेतला जाणार आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनीही राज्यातील तुरुंगांची संख्या वाढविली गेली पाहिजे हे मान्य केले असून तुरूंगातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याच्या सूचना तुरुंगाधिकार्‍यांना दिल्या आहेत.

Leave a Comment