
स्टॉकहोम दि.१३ – यंदाच्या वर्षात दिल्या जाणार्या नोबेल पारितोषिकांच्या रकमेत २० टक्के कपात करण्याचा निर्णय नोबेल फौंडेशनने नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे. भूतकाळातील गुंतवणुकींबाबत चुकलेले अंदाज आणि आर्थिक मंदी ही त्यामागची कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरवर्षी नोबेल फौंडेशनतर्फे शांतता, साहित्य, भौतिक, रसायन, वैद्यकीय आणि अर्थशास्त्र अशा विषयात विशेष कार्य करणार्या व्यक्तींना १ कोटी स्वीडीश क्रोनर पारितोषिक म्हणून दिले जातात. यंदाच्या वर्षी ही रक्कम ८० लाख स्वीडीश क्रोनर अशी असणार आहे. त्याविषयी अधिक माहिती देताना कार्यकारी संचालक लार्स हाइकेनस्टन म्हणाले की गेल्या दशकांत आम्ही ज्या गुंतवणूकी केल्या त्याचा परतावा अपेक्षेप्रमाणे मिळालेला नाही. त्यामुळे यापुढेही पारितोषिके आणि व्यवस्थापन खर्चाची तरतूद वेळीच केली जावी या दृष्टीने यंदा ही रक्कम कमी करण्यात आली आहे.
म्यानमारच्या विरोधी पक्ष नेत्या आन स्यू की या त्यांना १९९१ सालात मिळालेले शांततेसाठीचे नोबेल शनिवारी ऑस्लो येथे स्वीकारणार आहेत. त्यावेळी त्या भाषणही करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पारितोषिकाच्या रकमेत करण्यात आलेली कपात चर्चेची ठरली आहे.
संशोधक व शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या संपत्तीतून ही पारितोषिके दर वर्षी दिली जातात. त्यासाठी १९०० साली नोबेल फौंडेशनची स्थापनाही करण्यात आली असून १९०१ पासून हे पुरस्कार दिले जात आहेत. जगात हे पारितोषिक मानाचे समजले जाते.