केपीओमध्ये उत्तम पगाराच्या नोकर्‍या

भारताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये बीपीओ (बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग) ने मोठे स्थान प्राप्त केलेले आहे आणि त्यातून निर्माण होणार्‍या रोजगार संधीची माहिती आता सर्वांनाच झालेली आहे. भारतात माहिती तंत्रज्ञानाला खूप मोठी संधी आहे असे सांगितले जाते, ती संधी ज्या विविध शाखांमधून उपलब्ध होणार आहे त्या शाखांमध्ये केपीओ (नॉलेज प्रोसेस आऊटसोर्सिंग) ही प्रमुख शाखा आहे. अजून तरी भारतामध्ये केपीओच्या बाबतीत म्हणावी तेवढी जागरुकता निर्माण झालेली नाही. मात्र येत्या पाच-दहा वर्षांमध्ये केपीओचा व्यवसाय बीपीओसारखाच प्रचंड वाढणार आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होणार आहे. बीपीओमध्ये बिझनेस म्हणजे व्यवसायाच्या संबंधातील कामे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून केली जातात आणि स्वस्त मजूर उपलब्ध असलेल्या भारतासारख्या देशांना या व्यवसायामध्ये मोठी संधी असते. मात्र केपीओमध्ये केवळ स्वस्त मजूर हा एकच निकष उपयोगी पडत नाही. कारण केपीओमधून ज्ञानावर आधारित उद्योगाशी संबंधित माहिती आणि कामे आऊटसोर्सिंगच्या तंत्राने करून घेतली जातात. म्हणजे साहित्य विषयक माहिती, संशोधनाविषयी माहिती तसेच ज्ञानाची देवाणघेवाण असे केपीओचे विषय असतात. बीपीओ आणि केपीओ मध्ये हा एक मोठा फरक आहे. बीपीओमध्ये फक्त स्वस्त मजूर ही जमेची बाजू होते. त्यामुळे या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशाशी अविकसित जगातील कोणतेही देश स्पर्धा करू शकतात. म्हणून आता भारतातल्या बीपीओ उद्योगाला दक्षिण आफ्रिका, फिलिपाईन्स, कोरिया आणि चीन या देशातून कधीही आव्हान दिले जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. केपीओमध्ये मात्र अशी भीती नाही. कारण केपीओत काम करणार्‍या तंत्रज्ञांना उच्च दर्जाचे ज्ञान आणि भाषेवर कमालीचे प्रभुत्व असण्याची गरज असते. तूर्तास तरी भारतात असे लोक उपलब्ध आहेत आणि नजिकच्या काळात तरी भारताशी अन्य कोणता देश सहजासहजी स्पर्धा करू शकेल अशी स्थिती नाही. म्हणून दोन गोष्टी होतात. पहिली म्हणजे भारतात हा उद्योग वाढू शकतो आणि बीपीओच्या तुलनेत केपीओचे पगार जास्त असतात. आज बीपीओ क्षेत्रामध्ये चांगले पगार आहेत असे म्हटले जात असले तरी आणि भरपूर अनुभवानंतर त्यातील तंत्रज्ञांना २०-२५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळतात हे खरे असले तरी बीपीओच्या तंत्रज्ञांच्या पगाराची सुरुवात मात्र ८ ते १२ हजार रुपयांपासून होते आणि या क्षेत्रात काम करणार्‍या तंत्रज्ञांना पुढच्या अवस्थांमध्ये दरमहा ४० ते ६० हजार रुपयांपर्यंतही वेतन मिळू शकते. म्हणजे बीपीओपेक्षा केपीओतील पॅकेज अधिक आकर्षक आहे. केपीओच्या माध्यमातून ज्ञानाच्या ज्या क्षेत्रातील आऊटसोर्सिंगचे काम केले जात असते त्या क्षेत्रात कमालीचे प्राविण्य मिळवले तर याहीपेक्षा चांगला पगार मिळू शकतो आणि अशा लोकांना परदेशात जाऊन सुद्धा अधिक चांगले काम मिळवून अधिक आकर्षक वेतनही मिळवता येते. इंग्रजीवर प्रभुत्व आणि उत्तम ज्ञान याच्या आधारावर या क्षेत्रात नाव कमावता येते.

Leave a Comment