पुणे – पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कारभार अधिक पारदर्शक आणि ‘हायटेक’ व्हावा या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून येत्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले. पाच कंपन्यांनी विद्यापीठातील प्रमुख पदाधिकार्यांना परीक्षा विभागाचे काम जलद कसे करता येईल याबाबतचे प्रात्यक्षिकही दाखविले.
गाडे म्हणाले की, विद्यापीठाच्या परीक्षा, प्राध्यापकांची संख्या आणि विद्यार्थी संख्या यांचे गणित जुळविणे फार कठिण काम झाले आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे ४५ दिवसात विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या सर्वच परीक्षांचे निकाल जाहिर करणे अवघड जाते. त्यामुळे अत्याधिनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर अधिक भर देण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे. पुढील काळात प्रश्नपत्रिकांचे परीक्षा केंद्रांना वाटप करणे, उत्तरपत्रिकांचे मुल्याकन करणे, परीक्षेची माहिती संकलित करणे व निकाल जाहिर करणे ही कामे तंत्रज्ञानाच्या सहय्याने करण्याचा प्रयत्न विद्यापीठातर्फे केला जाणार आहे.
परीक्षा विभागातील विविध कामे संगणकिकृत कशी करता येतील यासंदर्भात माईंड लॉजिक एक्स, पर्सिस्टंट, एम.के.सी.एल., मेरीट ट्रॅक, एकलव्य, या पाच कंपन्यांनी विद्यापीठाच्या पदाधिकार्यांमोर सादरीकरण केले. हे सादरीकरण पाहून आता एक प्रकल्प तयार केला जाईल. त्याला बोर्ड ऑफ स्टडीज व विद्यापरिषदेतर्फे मंजूरी घेतली जाईल. त्यानंतर परीक्षा विभागाचे काम आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करून घेण्यासंदर्भात निविदा जाहिर केल्या जातील. मगच हे काम एखाद्या कंपनीला दिले जाईल. यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागेल असेही गाडे यांनी सांगितले.