राष्ट्रीयकृत बँकांची तक्रार केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे कळणार – जयंत पाटील

मुंबई, दि. ११ – बचतगटांच्या माध्यमातून लाखो कुटुंबे आर्थिकदृष्टया स्वावलंबी होत आहेत. आर्थिक चळवळ वेग घेत असताना बचतगटांना अर्थसहाय्य करण्यास काही राष्ट्रीयकृत बँका तयार होत नाहीत. या बँकाची माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाला कळवली जाईल. त्याचबरोबर राज्यांतील खासदारांनी या विषयाचा पाठपुरावा करावा, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र पुरस्कार योजना, राज्यस्तरिय दक्षता आणि नियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत राज्यात २.२५ लाखांपेक्षा अधिक बचतगटांची स्थापना झाली असून, आता या योजनेचे राष्ट्रीय जीवन उन्नती अभियानात रूपांतर केले जात असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात अभियानाअंतर्गत १२ जिल्हयात काम सुरू झाले आहे, केंद्र शासनाने या अभियानाच्या पूर्वतयारी करीता २०१०-११ या आर्थिक वर्षात १.५० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. तर राज्य शासनाने हे अभियान राबवण्याकरिता २०१२-१३ या आर्थिक वर्षांमध्ये ४ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. या बचतगटांना देण्यात येणारा फिरता निधी १० हजार रूपयांवरून १५ हजार रूपये इतका वाढविण्यात आला आहे.

Leave a Comment