माहीने केले पहिल्यांदाच मतदान

रांची दि.१३- भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माहीने त्याच्या आयुष्यातील पहिले निवडणूक मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. हातिया मतदारसंघात काल विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली तेव्हा माहीने आपले आईवडील आणि मेहुण्यासह येथे मतदान केले.

निवडणूक आयोगाचा धोनी हा ब्रँड अँबेसिडर आहे आणि आपल्या लोकशाहीच्या या उत्सवात सामील व्हा असे आवाहन तो मतदारांना करतो.काल त्याने आपणही मतदान केले आहे आणि आपला हक्क बजावला आहे हे कृतीतून सिद्ध केले. टीशर्ट, स्पोर्टस कॅप अशा पोशाखात आलेल्या माहीला पाहण्यासाठी मतदान केंद्राबाहेर प्रचंड गर्दी होती. त्यामुळे माहीला कडक सुरक्षा देण्यात आली होती. त्याच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रथमच धोनी मतदानाच्या दिवशी शहरात होता. मतदान करून त्याने मतदारांना निवडणूक लाईटली घेऊ नका तर आपल्या पसंतीचा योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावा असा संदेशच जणू दिला आहे.

Leave a Comment