मुंबईत ४ अनधिकृत सोनाग्राफी सेंटर्स पालिकेकडून सील

मुंबई, दि. ११ – बीड जिल्हयातील स्त्रीभूण हत्येचे पडसाद मुंबईसह राज्यभरात उमटले आहेत. मुंबईतही दोन दिवसांपूर्वीच स्त्रीभूण हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. पालिका आरोग्य खात्याच्या पथकाने मुंबईतील सोनोग्राफी सेंटरची झाडाझडती शनिवारपासून सुरू केली आहे.
 
बेकायदेशीरपणे गर्भलिंग परिक्षण करण्याच्या ४ सोनोग्राफी सेंटरना पालिका आरोग्य पथकाने सील ठोकले आहे. या कारवाईची माहिती पालिका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर यांनी दिली.

मुंबईत १३३९ परवानाधारक सोनोग्राफी सेंटर आहेत पालिका आरोग्य विभागाने प्रत्येक विभाग कार्यालयाच्या अंतर्गत येणार्‍या सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी ३ तज्ञांची समिती नेमली आहे. या समितीने सोनोग्राफी सेंटरची तपासणी व चौकशी करण्यात आली आहे. त्यापैकी कुर्ला, दादर, मालाड व अंधेरी या विभागातील ४ सोनोग्राफी सेंटर्समधून बेकायदेशीर गर्भलिंग परिक्षण करून रूग्णांना माहिती देण्यात आली होती. त्यामुळे आरोग्य खात्याने या ४ सोनोग्राफी सेंटर्सला सील ठोकले आहे अद्याप चौकशी सुरू असून त्यातून येणार्‍या निष्कर्षानूसार सोनोग्राफी सेंटरचा परवाना रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Comment