गोनीदांच्या ‘दुर्गचित्र’ संग्रहाचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्या प्रकाशन

पुणे, दि. १२ – दिवंगत इतिहासतज्ज्ञ आणि कादंबरीकार गोपाल नीलकंठ दांडेकर यांनी टिपलेल्या दुर्मिळ छायाचित्रांच्या ‘दुर्गचित्र’ या संग्रहाचे प्रकाशन येत्या बुधवारी सायंकाळी टिळक स्मारक मंदिर येथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

गोनीदांनी टिपलेली छायाचित्रे सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि विलक्षण जिद्द याचा नमुना आहे. ते छायाचित्रांचा ‘चित्रे’ असाच उल्लेख करायचे. त्यामुळे तोच धागा पकडून दुर्गचित्रांचे संकलन करण्यात आले आहे. गोनीदांच्या कन्या डॉ. वीणा देव यांनी ‘गोनीदांची दुर्गचित्रे’ हा छायाचित्रांचा संग्रह संकलित केला आहे. कृष्णधवल चित्रांमधून रसिकांना सुमारे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपूर्वीची ऐतिहासिक वास्तूंची रुपे आढळतील. दुर्गांच्या वेगळ्या कोनातून काढलेल्या प्रतिमा दिसतील. ती छायाचित्रे अनुभविण्यासाठी सहाय्यभूत होईल, असा मजकूर हेही या संग्रहाचे वेगळेपण असणार आहे. त्यांच्या लिखाणात जसे त्या-त्या प्रदेशातील बोलीभाषा, खास ठेवणीतले शब्द, माणसं, पेहराव, चालीरिती उलगडतात तसाच निसर्गही मनाला थेट भिडून जातो. साधारणपणे १९६० ते १९८३ या कालखंडात भटकंती करुन दुर्ग, लेणी, गुहा, मंदिर यांची असंख्य छायाचित्रे टिपली आहेत. त्यातील निवडक छायाचित्रे त्यांच्या पुस्तकांमधून पाहता येतात. मात्र, त्यांची अनेक कलात्मक छायाचित्रे दुर्गप्रेमींसमोर आली नाहीत, ती या संग्रहाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत.

याबाबत गोनीदांच्या कन्या डॉ. वीणा देव यांनी सांगितले. या छंदासाठी गोनीदा यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याकाळी सतत त्यांच्या गडवार्‍या सुरु होत्या. या भटकंतीत कॅमेराही त्यांचा सोबती झाला. विविध ऋतूंमध्ये गडकोट कसे दिसतात, हे छायाचित्रांतून टिपण्याची त्यांना आवड होती.

Leave a Comment