काही लाख वारकर्‍यांसह माऊलीची पालखी पंढरपूरसाठी रवाना

पुणे, दि. ११ – महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास असणार्‍या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सायंकाळी अडीचशे किमीच्या पायी प्रवासाला आज सायंकाळी आळंदीहून रवाना झाली. पहाटेपासूनच सार्‍या आळंदीपासून देहूपर्यंतच्या भागाला प्रत्यक्ष वारीचे रूप आले होते. काल देहूहून निघालेली संत तुकाराम महाराज यांच्या चरणपादुकांची पालखी आज निगडीला पोहोचली आहे. त्यामुळे आळंदीपासून पुण्यापर्यंत आणि देहूपासून निगडीपर्यंत सर्वत्र दिंड्यांच दिसत आहेत. आळंदीत आज जवळ जवळ तीन लाख वारकर्‍यांचा मुक्काम आहे त्यांनीही या पालख्या बरोबर पंढरीला जाण्याचे प्रस्थान ठेवले आहे.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्थ डॉ शिवाजीराव मोहिते आणि पालखी सोहळा प्रमुख सुधीर पिंपळे यांच्या उपस्थितीत पहाटेपासून काकडा आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुग्धाभिषेक व नंतर भक्तांचे अभिषैक यांना आरंभ झाला. पहाटेपासूनच दर्शनाची रांग होती. आळंदीत सर्वत्र धर्मशाळेत व खाजगी निवासस्थानातून वारकर्‍यांचे मुक्काम पडले होते. त्याखेरीज अडीचशे पेक्षाही अधिक दिंडयांनी आपले मुक्काम मोकळ्या जागेत ठेवले होते. पहाटेपासूनच इंद्रायणीत स्नाने सुरु होती. हरिपाठाच्या अभंगातून सारे वारकरी संत ज्ञानेश्वरांचे अंतरंग समजून घेत होते.

सायंकाळी तीन वाजल्यापासूनच मंदिर परिसरात मानाच्या दिंड्या दाखल होऊ लागल्या. सर्वांचे शुभ्र पोषाक आणि गांधी टोप्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी पाच वाजता प्रत्येक दिंडीला प्रथम संत ज्ञानेश्वर देवस्थानच्या वतीने सन्मानपूर्वक निरोपाचा सत्कार करण्यात आला व नंतर संत हैबतबाबांसंस्थेच्या पालखी सोहोळा प्रमुखांच्या सत्कार करून त्यांचे वारीत स्वागत केले जात होते. पाच वाजता प्रदक्षिणा सुरु झाल्या व सारा परिसर जणू टाणमृदंगाच्या गजरावरच श्वास करू लागला. सहा वाजून चाळीस निमिटांनी संस्थानच्या वतीने पादुका पालखीसोहोळा प्रमुखांच्या ताब्यात देण्यात आल्या. त्या पांडुरंगाच्या गजरात पालखीत ठेवण्यात आल्या. आता पुढचे वीस दिवस प्रत्येक पाऊल माउलीबरोबर वारीतून जायचे निश्चयाने भारावलेले वारकरी  ‘आनंदाचे डोही आनंद तरंग ’ चा अनुभव घेत होते. सात वाजता पालखीच्या प्रदक्षिणेला आरंभ झाला. प्रदक्षिणा पूर्ण होताना सार्‍यांनी अजानवृक्ष आणि सुवर्ण पिंपळाचाही निरोप घेतला. वारकर्‍यांचा भजनाचा ठेका निरनिराळ्या खेळात रुपांतरीत होत होता. सव्वासात वाजता पालखी बाहेर आली आणि मंदिरासमोर जमा झालेल्या सार्‍या आळंदीने  पादुकांचे दर्शन घेतले. पारंपारिक पद्धतीप्रमाणे आज पालखीचा मुक्काम गांधी वाडयात राहणार आहे व उद्या सकाळी ती पुण्याला रवाना होईल.

मुलगी सुखाचा कळस पांडुरंगाची तुळस
यावेळच्या पालखीचे अजून एक वैशिष्ठ्य आहे ते म्हणजे पुण्यातील निरनिराळ्या मोठया कंपन्यातून काम करणार्‍या तरुणांनी स्त्री भ‘ुणहत्येच्या विरोधात जागृती करण्यासाठी ‘आय टी दिंडी’ काढली आहे.‘मुलगी सुखाचा कळस पांडुरंगाची तुळस’ हा संदेश देणारी भजनातून लोकजागृती करणार आहे.

Leave a Comment