भारताचे गुंतवणूक मानांकन जाण्याचा इशारा

गुंतवणूक मानांकन देणार्‍या स्टँडर्ड अॅन्ड पूअर्स संस्थेने भारतातील आर्थिक सुधारणांचा वेग असाच राहिला आणि आर्थिक सुधारणांतील राजकीय हस्तक्षेप थांबला नाही तर भारताचे गुंतवणूक मानांकन जाऊ शकते असा इशारा दिला आहे. असे घडले तर ब्रिक देशातील गुंतवणूक मानांकनातून बाहेर पडणारा भारत हा पहिला देश असेल. ब्रिक देशात भारत, चीन, ब्राझील आणि रशिया या देशांचा समावेश आहे.

स्टँडर्ड अॅन्ड पुअरचे क्रेडीट अॅनालिस्ट जयदीप मुखर्जी याबाबत बोलताना म्हणाले की संस्थेने यापूर्वीच भारताचे मानांकन स्थिर वरून निगेटिव्ह असे केले आहे. भारतातील आर्थिक सुधारणांचा मंदावलेला वेग आणि त्यामुळे विकास वाढीच्या दरावर त्याचा होत असलेला परिणाम पाहता यापूर्वी दीर्घकालीन काळासाठी जे बीबीबी रेटिंग दिले गेले आहे त्याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. राजकीय हस्तक्षेप हाच आर्थिक सुधारणांतील महत्त्वाचे अडथळा आहे. भारताने अधिक उदारमतवादी धोरण तातडीने स्वीकारणे गरजेचे आहे. व्यापारी तूट वाढल्याने रेटिंग निगेटिव्ह झाले आहेच पण त्याचाच परिणाम म्हणून महत्त्वाच्या दहा बँकांचे पतमानांकन आऊटलूकही कमी केला गेला आहे. त्यात स्टेट बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा महत्त्वाच्या बँकांचा समावेश आहे.

अर्थात भारतात समस्या मोठ्या असल्या तरी देशाची अर्थव्यवस्था चांगली असल्याचेही मुखर्जी यांनी सांगितले. जागतिक पातळीवरील अस्थिरता लक्षात घेता भारताची अर्थव्यवस्था १९९० पेक्षा चांगली असल्याचे सांगून ते म्हणाले की १९९० साली देशाकडे ७ दिवस पुरेल इतकीच गंगाजळी होती.

Leave a Comment