आता घरच्या घरीच करा बुटांचे प्रिटींग

तुम्हाला सिंड्रेलाची गोष्ट माहिती आहे ? राजपुत्रासोबतच्या पार्टीत जाण्यासाठी गरीब बिचार्‍या सिंड्रेलाकडे नव्हता पोशाख आणि नव्हते मॅचिंग शूज. मग परीदेवी आली आणि सिंड्रेलाला अधिक सुंदर बनविणारे काचेचे बूट दिले आणि सिंड्रेला पार्टीत जाताच राजकुमार तिच्यासाठी वेडा झाला. पुढची गोष्ट जाऊ दे

आता इतके खरे की तुम्हालाही रात्रीच्या पार्टीला जायचेय किंवा दिवसाच्या पार्टीलाही जायला हरकत नाही. मॅचिंग कडक हवे. पण ड्रेसला मॅचिंग बूट नाहीत. थांबा! त्यासाठी आता बाजार गाठायला नको. तुमचे रोजच्या वापरातले बूट तुम्ही घरच्याघरी ताबडतोब हव्या त्या मॅचिंग शेडमध्ये प्रिंट करू शकाल असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून ते येत्या दशकातच तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार आहे.

स्टाईलसाईटची मार्केट अॅनालिस्ट आणि ट्रेंड फोरकास्टर म्हणून ओळखली जाणारी जेन मॉनिंगटन हिने हे तंत्रज्ञान अविश्वसनीय असून वॉर्डरोबमध्ये क्रांती घडवून आणणारे आहे असे सांगितले आहे. या तंत्रज्ञानाचे क्रूड व्हर्जन सध्याही बाजारात आहे मात्र ते महाग आहे. त्यासाठी ६०० पौंडस मोजावे लागतात. मात्र हे तंत्रज्ञान जसे अधिक विकसित होईल तसे ते स्वस्तात उपलब्ध होऊ शकणार आहे. काय आहे हे तंत्रज्ञान? तर इंकजेट प्रिंटरप्रमाणेच काम करणारा हा थ्रीडी प्रिंटर आहे. इंकजेट मध्ये जशी प्रतिमा तयार होण्यासाठी शाईचे थर दिले जातात तसेच यात वितळलेले प्लॅस्टीक वापरण्यात आले असून तुम्हाला हवे ते प्रिंट घेण्यासाठी या प्लॅस्टीकचे एकावर एक थर देऊन प्रिंट केले जाते. मायक्रोव्हेव्ह अथवा ओव्हनप्रमाणेच दिसणारा हा प्रिंटर साधारण तितक्याच आकाराचा आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चटकन आणि स्वस्तात तसेच घरच्याघरी आपले जोडे प्रिंट करणे सोयीचे ठरेल नाही का?

Leave a Comment