‘रोबो‘व्दारे नालेसफाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे नालेसफाईसाठी नव्याने घेतलेल्या ‘रोबो‘व्दारे नालेसफाई करणार्‍या संयंत्राच्या प्रात्यक्षिकाची पाहणी महापौर सुनील प्रभ, सभागृह नेते यशोधर फणसे, स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्यासह अतिरीक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) असीम गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी करण्यात आली. एल ऍण्ड टी पवई पाईपलाईन, पवई यार्ड, मिठी नदी येथील नालेसफाईची पाहणी करण्यात आली.
सदर संयंत्र हे मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी वापरण्यात येणारे संयंत्र असून ते जे. सी. बी. पोक्लेन व ड्रेजर या तिन्ही संयंत्राचे काम करू शकते. सदर संयंत्राचा उपयोग नाल्याच्या कामाच्या ठिकाणापर्यंत ने-आण करण्यासाठी करता येतो. या संयंत्राव्दारे हे काम कमी वेळेत सुलभ व कमी खर्चात होते. यासाठी उच्च क्षमतेच्या क्रेनची आवश्यकता पडत नाही. सदर संयंत्र नाल्यात उतरविण्याअगोदर करावयाचा रस्ता, रॅम यासारखी पूर्वतयारीची कामे करण्याची गरज या संयंत्रासाठी भासत नाही. सदर संयंत्राची हालचाल विविध अंशामधून होत असल्यामुळे नालेसफाई व्यतिरिक्त सदर संयंत्र काम करू शकते. नालेसफाई व्यतिरिक्त सदर संयंत्र जड वस्तू उचलणे, रस्ता खणणे, झाडे कापणे इत्यादीसाठी वापरता येते.
सुमारे २४० घन मीटर गाळ काढण्याची सदर संयंत्रेची क्षमता आहे. सदर संयंत्र दोन मीटर नाल्याच्या पाण्याच्या पातळीपर्यंत व २.५ मीटरपेक्षा जास्त रूंद नाल्यात काम करू शकते. या संयंत्राचा टेलिस्कोपीक बूम ९.९ मीटरपर्यंत लांब होऊ शकतो. तसेच त्याच्या बकेटची क्षमता ४०० लिटर एवढी असून इंजिन क्षमता १५० एच. पी. एवढी आहे.

Leave a Comment