चेतन्यदायी कवी

सोलापूरचे ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांचे निधन झाले. महाराष्ट्रातल्या अतीशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशा निवडक कवींमध्ये त्यांचा समावेश होत असे. गेली ५० वर्षे महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत दिवाळी अंकांच्या काव्य दालनात हमखास हजेरी लावणारे आणि मराठी काव्यदालनात आपल्या विचारांच्या हिरेमोत्यांची भर टाकून त्याला समृद्ध करणारे कवी असा त्यांचा महिमा होता. तीन वर्षांपूर्वी मराठवाडा नेता तर्फे युवकांसाठी व्यक्तिमत्त्व विकासावर चर्चासत्र घेतले होते. त्यात सहभागी झालेल्या तरुणांना मार्गदर्शन करायला आणि उत्तम जगण्याची प्रेरणा द्यायला केवळ ७६ वर्षांचे हे कवीवर्य दत्ता हलसगीकर आले होते. त्यांच्या या सहभागाने आमच्या अंत:करणात त्यांची स्मृती कायमची कोरून गेली आहे. केस पूर्ण पांढरे झालेले दत्ता हलसगीकर बोलायला उभे राहिले. अवघे पाऊणशे वयमान झालेले हे कवी तरुणाईला मार्गदर्शन करायला उभे राहिले तेव्हा ते काय बोलणार अशी उत्सुकता सर्वांच्या मनात दाटून आली होती पण, त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात, वय झाले आहे माझे पण अजूनही फुलांची निमंत्रणं येत असतात मला, अशी केली.

कवीमध्ये थोडक्यात बरेच काही सांगून जाण्याची ताकद असते. खरा कवी तोच असतो जो एका ओळीतून सारे वातावरण बदलून टाकत असतो. दत्ताजींनी ही किमया आपल्या त्या दोन ओळीतून केली आणि सारे सभागृह या ‘तरण्याबांड’ कवीची ओळ न् ओळ काना मनाने टिपून घ्यायला उत्सुक झाले. कवीची करामत आम्ही याचि देही याचि डोळा अनुभवली. मग सुरू झाली एक जुगलबंदी. शरीराने तरुण असलेल्या श्रोत्यांची आणि मनाने तरुण असलेल्या कवीची जुगलबंदी. या तरुणाईला अधिक खुलवत दत्ताजींनी मग कविता सादर केली ‘रंगसंगती’. चक्क दररोज एक नवे मॅचिंग करून येणार्‍या तरुणीवर केलेले ते भाष्य ऐकताना विशी बाविशीतल्या पोरांना सुद्धा आपणच दत्ताजीपेक्षा म्हातारे आहोत असे वाटायला लागले. शब्दाच्या प्रभावाचा तो विलक्षण साक्षात्कार होता. आपल्या शब्दांचं गारुड अधिक पक्के करीत करीत दत्ताजी मैफिल रंगवायला लागले पण त्यांनी हळूच पोरांना वस्तुस्थितीची जाणीव देणारी आणि गरिबीच्या झळा काय असतात हे सांगणारी ‘दिवाळी’ ही कविता ऐकवली, बुक बाइंडिंग करून मिळवलेल्या पैशात आम्ही बहिणीला ओवाळणी टाकली असं म्हणताना दत्ताजींच्या डोळ्यात तर पाणी आलंच पण तरुण श्रोत्यांचेही डोळे भरून आले.

आज दत्ता हलसगीकर यांच्या दु:खद निधनाची बातमी ऐकताना आम्हाला आजही ती मैफिल आठवली. हलसगीकर यांची ‘उंची’ ही कविता तर आपण कसं जगलं पाहिजे हे सांगून जाणारी आहे. तिचा अनुवाद देशातल्या १९ भाषांत झाला आहे. म्हणजे भारतात अनेक ठिकाणी ही कविता म्हटली जाते, ऐकली जाते आणि अनेकांना जगण्याचं बळ देऊन जगण्याचा मार्ग दाखवत असते. दत्ता हलसगीकर यांना मराठीतले काव्यासाठीचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे ९ कविता संग्रह आणि अनेक लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या अजोड काव्य सेवेला मराठी रसिकांनीही अनेकदा मानाचा मुजरा केला होता. मलेशियात झालेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या आणि त्यांच्याच कवितांचा एक विशेष कार्यक्रम झाला. तो जगभरातल्या मराठी रसिकांनी ऐकला. उपभोगला. अनुभवला आणि कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी त्यांना उठून टाळ्या वाजवून अभिवादन केलं. पाश्‍चात्त्य देशात श्रोत्यांना फार आनंद झाला तर तो केवळ टाळ्या वाजवून साजरा केला जात नाही. टाळ्या अपुर्‍या पडतात मग लोक उठून उभे राहून टाळ्याचा कडकडाट करतात. त्याला स्टँडिंग ओवेशन म्हटले जाते. मराठी रसिकांनी दत्ताजींना स्टॅँडिंग ओवेशन देऊन आपल्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर असा व्यक्त केला होता.

दत्ताजींनी केलेले शेवटचे भाषण १९ मे रोजीचे होते. दिवंगत कवी चंद्रभूषण कुलश्रेष्ठ यांच्या काव्यशिल्पाचे अनावरण करताना त्यांनी शेवटचे भाषण केले. त्यात ते म्हणाले होते, कविता हा वरवर अनुभवण्याचा विषय नाही. जो कविता वरवर अनभुवतो त्याला काही मिळत नाही पण कवितेच्या सागरात जो खोलवर बुडतो त्यालाच मोती सापडतात. स्वत: हलसगीकर कवितेच्या समुद्रात खोल बुडून काही मोती घेऊन आले होते आणि त्या मोत्यांच्या माळा समाजाला वाटत होते. ते मोती असतात समाजासाठी जगण्याच्या विचाराचे. हलसगीकरांनी म्हटले, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत. पण स्वत: हलसगीकरांच्या बागेत पैशाची झाडे फार फुलली नव्हती. विचारांची बाग मात्र चांगलीच फुलून आली होती. त्यांना देवाने दिलेल्या अंतर्द्रष्टीची बाग केवळ फुललीच नाही फळाला आली होती. म्हणून त्यांनी आपल्या दृष्टीची दोन फुले देण्याचा निर्धार केला. त्यांनी डोळे दान केले. त्यातून कोणाला तरी दृष्टी मिळेल. दत्ताजी गेले पण ते दृष्टीरूपे उरले आहेत. त्यांच्या पश्‍चात कोणी तरी त्यांच्या दृष्टीने या जगाकडे पाहणार आहे. मरावे परी दृष्टीरूपे उरावे हे वचन त्यांनी सार्थ केले आहे.