आंदोलन करणार्‍या ३०० वैमानिकांची हकालपट्टी ?

नवी दिल्ली, दि. ११ – गेल्या ३५ दिवसांपासून एअर इंडियाच्या वैमानिकांनी आजारपणाच्या रजेवर जाण्याचे जे आंदोलन सुरू केले आहे, ते लक्षात घेऊन या वैमानिकांविरूद्ध कठोर भूमिका घेण्याचे एअर इंडिया व्यवस्थापनाने ठरविले आहे. आंदोलन करणार्‍या सुमारे ३०० वैमानिकांना कामावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापनाशी संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. नागरी विमान वाहतूकमंत्री अजितसिंह यांनीही तसे संकेत सोमवारी दिले.

अजितसिंह म्हणाले की, आंदोलन करणार्‍या वैमानिकांसंदर्भात काय भूमिका घ्यायची, हे एअर इंडिया व्यवस्थापनास लवकरच ठरवावे लागेल. वैमानिकांचे आंदोलन पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तसेच आंदोलन करणार्‍या वैमानिकांची कामावर परतण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उच्च न्यायालयाने वैमानिकांचे आंदोलन बेकायदेशीर ठरविले आहे. तरीही या वैमानिकांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. आंदोलन करणार्‍या वैमानिकांनी कामावर परतावे, अशी विनंती आम्ही त्यांना वारंवार केली आहे. पण तरीही ते अद्याप कामावर आलेले नाहीत. त्यामुळे आंदोलन करणार्‍या वैमानिकांना कंपनीच्या पे रोलवर किती काळ ठेवायचे, याचा निर्णय एअर इंडिया व्यवस्थापनाने करावयाचा आहे.

वैमानिकांची संघटना इंडियन पायलट्स गिल्डने सोमवारी म्हटले की, एअर इंडियाच्या व्यवस्थापनास हा तिढा सोडविण्याच्या ऐवजी त्यामध्ये अधिक गुंता निर्माण करायचा आहे. वैमानिकांना बडतर्फ करण्याच्या नोटिसा बेकायदेशीर असल्याचे कामगार मंत्रालयाने याआधीच सूचित केले आहे.

वैमानिकांचे आंदोलन लक्षात घेऊन सुमारे १०० वैमानिकांची नव्याने भरती करण्यात येईल, असे नागरी विमान वाहतूकमंत्री अजितसिंह यांनी याआधीच घोषित केले आहे. एअर इंडियाच्या वैमानिकांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे या हवाईसेवेची फक्त ७५ टक्के आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालू आहेत. त्यामुळे दररोज १० ते १५ कोटी रूपयांचे नुकसान होत आहे.

Leave a Comment