नवी दिल्ली दि.११- राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून काँग्रेसने अखेर अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असून त्यासंबंधीची अधिकृत घोषणा १५ जूनला होण्याची शक्यता आहे. मात्र प्रणव मुखर्जी यांना उमेदवारीसंबंधीची कल्पना काँग्रेसने दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी.रंगराजन यांची मुखर्जी यांच्या जागी अर्थमंत्री पदी नेमणूक केली जाणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांच्या नावांला सरकारातील कांही घटक पक्षांचाच विरोध होता. भाजपने काँग्रेसच्या कुठल्याच उमेदवाराला पाठींबा देणार नसल्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली होती. सरकारमधील घटक पक्ष तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचाच मुखर्जी यांना विरोध होता. मात्र त्यांची समजूत काढण्यात काँग्रेसला यश आले असून आज सकाळीच ममतांनी प्रणव यांच्य नावाला विरोध नसल्याचे जाहीर केले आणि त्यामुळे प्रणव मुखर्जी यांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर झाला असे सूत्रांकडून समजते. मात्र निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतरच उमेदवाराचे नांव घोषित करता येणार असल्याने ही घोषणा १५ जूनला होईल असेही सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीचे सर्व हक्क काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात आले होते.त्यानंतर ९ जून रोजी सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी, द्रमुक, राष्ट्रीय लोकशाही आघाडी या पक्षांचा पाठींबा सोनिया गांधी यांनी यापूर्वीच मिळविला आहे तसेच समाजवादी पक्षालाही आपलेसे करण्यात त्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांचा मार्ग अधिक सुलभ झाला असल्याचे सांगितले जात आहे.