बीईएमएलचे प्रमुख नटराजन निलंबित

नवी दिल्ली, दि. ११ – केंद्रीय गुप्तचर विभागाने टाट्रा ट्रक प्रकरणी केलेली शिफारस लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाने सोमवारी बीईएमएलचे प्रमुख व्हीआरएस नटराजन यांना निलंबित केले. परवानगी न घेता तत्कालीन लष्कर प्रमुख व्ही. के.सिंह यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविल्याबद्दल संरक्षण मंत्रालयाने नटराजन यांच्यावर ’कारणे दाखवा’ नोटीस बजाविली होती.

या कारवाई संदर्भात बोलताना संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशू कार म्हणाले की, टाट्रा ट्रक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करता यावी म्हणून नटराजन यांना बाजूला करण्यात यावे, अशी जी शिफारस केंद्रीय गुप्तचर विभागाने केली आहे, ती लक्षात घेऊन सरकारने निलंबनाची कारवाई केली. आता नटराजन यांच्या पदाची सूत्रे पी. द्वारकानाथ यांच्याकडे देण्यात आली आहेत.

माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी जे कथित बदनामीकारक वक्तव्य केले होते, त्यासंदर्भात जनरल सिंह यांनी माफी मागावी, अशी मागणी करणारी नोटीस नटराजन यांनी त्यांच्यावर बजाविली होती. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने, गेल्या ६ जून रोजी नटराजन यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. नटराजन यांना अशा प्रकारची कोणतीही कायदेशीर नोटीस बजाविण्यास संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली नव्हती, असे सरंक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशू कार यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकरणी माध्यमांकडे का धाव घेतली, याचेही स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाने नटराजन यांच्याकडे मागितले होते.

जनरल व्ही. के. सिंह हे लष्कर प्रमुख पदावरून गेल्या ३१ मे रोजी निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वीच्या आधी काही काळ, टाट्रा ट्रक लष्कराने घ्यावेत यासाठी आपणास एका माजी लष्करी अधिकार्‍याने १४ कोटी रूपयांची लाच देऊ केली होती, असा आरोप केला होता. टाट्रा ट्रक हे बीईएमएलकडून पुरविण्यात येतात. जनरल व्ही. के. सिंह यांनी केलेला आरोप लक्षात घेऊन केंद्रीय गुप्तचर विभाग या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

जनरल व्ही. के. सिंह निवृत्त झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे १ जून रोजी बीईएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या नटराजन यांनी बंगळूरू येथे पत्रकार परिषद घेऊन, माजी लष्कर प्रमुखांनी आपली कंपनी आणि कंपनीच्या उत्पादनासंदर्भात जी बदनामीकारक वक्तवे केली त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र माजी लष्कर प्रमुखांनी माफी मागण्यास नकार देऊन, आपण केवळ वस्तुस्थिती मांडली, असे स्पष्ट केले होते.

Leave a Comment