डेलची उत्पादने आता अधिक महाग

डेल या जागतिक कीर्तीच्या संगणक उत्पादक कंपनीने त्यांच्या कांही उत्पादनांच्या किमती वाढविल्या आहेत. रूपयाचे मोठ्या प्रमाणावर झालेले अवमूल्यन हे त्यामागचे मुख्य कारण असल्याचे कंपनीचे कार्यकारी संचालक व जनरल मॅनेजर महेश भल्ला यांनी सांगितले.

याविषयी अधिक बोलताना भल्ला म्हणाले की रूपयाचे अवमूल्यन १ ते दोन टक्के असते तर कंपन्या ते सहज झेलू शकल्या असत्या. मात्र मे २०११ ला रूपया डॉलरचा दर ४५ ला १ असा असताना यावर्षी मे मध्ये तो ५६ ला १ असा झाला आहे. म्हणजे रूपयाचे मूल्य २४ टक्क्यांनी घटले आहे. त्यातच थायलंडमधील पूर व जपानमधील त्सुनामी यामुळे तेथील हार्डवेअर कंपन्यांचे विस्कळीत झालेले कामकाज अजून पूर्ववत झालेले नाही. परिणामी सुट्या भागांची टंचाई जाणवते आहे आणि उपलब्ध सुटे भाग अधिक किमतींना विकले जात आहेत त्यामुळे डेलने त्यांचे डेस्कटॉप व लॅपटॉप यांच्या किमती १० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

एमएआयटी या आयटी हार्डवेअर संस्थेने सरकारकडे पूर्वी करण्यात आलेल्या करारांचे पुर्नमूल्यांकन करण्याची परवानगी मागितली आहे. डेलच्या संगणकांना भारतात चांगली मागणी आहे मात्र तरीही फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत कंपनीचा नफा ३३ टक्कयांनी घटला आहे. भारतातील तरूणाईला आकर्षित करण्यासाठी डेलने दोन नवे लॅपटॉप बाजारात आणले असून इन्सिरेशन सिरीजमधील हे लॅपटॉप विद्यार्थी आणि प्रोफेशनल लोकांसाठी उत्तम आहेत. आर सिरीजचा लॅपटॉप ३९,९९० रूपयांना तर आर स्पेशल एडिशन ५१,१४६ रूपयांना असल्याचेही भल्ला यांनी सांगितले.