जगनमोहन रेड्डी यांना २५ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

हैदराबाद, दि. ११ – बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांना आणखी दोन आठवडे तुंरूगात राहावे लागणार आहे. दरम्यान, रेड्डी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय गुप्तचर विभागाने केली आहे.

सोमवारी जगनमोहन रेड्डी यांना नामपल्ली येथे विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी सीबीआय न्यायालयाने जगनमोहन रेड्डी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचा निर्णय दिला.

आंध्रप्रदेशामध्ये लोकसभेच्या एका जागेसाठी आणि  विधानसभेच्या १८ जागांसाठी मंगळवारी, १२ जून रोजी मतदान होणार असून १५ जून रोजी मतमोजणी  होणार आहे. या पोटनिवडणुका म्हणजे २०१४ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांची उपान्त्य फेरी मानली जात आहे. या पोटनिवडणुकांमध्ये रेड्डी यांचा पक्ष चांगली कामगिरी बजावेल,  असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निवडणूक प्रचार ऐन भरीस असताना जगनमोहन रेड्डी यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. गेल्या १५ दिवसांपासून जगनमोहन रेड्डी तुरूंगात असल्याने त्यांची आई  विजयालक्ष्मी या प्रचाराची धुरा सांभाळीत आहेत. प्रचारकार्यात त्यांची मुलगी शर्मिला ही ही त्यांच्यासमवेत उतरली आहे.