संसदेत इतर आरोपी खासदारांकडे सुद्धा राजीनामा मागा – चिदंबरम

नवी दिल्ली, दि. ८ – चेन्नई उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या याचिकेमुळे विरोधकांना आयतेच कोलित मिळाल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम अक्षरशः हतबल झाले आहेत.त्यातून संसदेतील १११ खासदारांवर देखील विविध खटले सुरू असल्याची माहिती देऊन, केवळ आपण एकट्यानेच राजीनामा का द्यायचा, असा उद्विग्न सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मर्जीतील मंत्री अशी ओळख असलेल्या चिदंबरम यांची संपुआ-२ सरकारमधील गृहमंत्री पदाची कारकिर्द सुरवातीपासूनच वादग्रस्त ठरते आहे. कधी २-जी स्पेक्ट्रम वितरणामधील घोटाळा, तर कधी एअरसेल-मॅक्सिस कंपनीत असलेली चिदंबरम पुत्राची कथित गुंतवणूक यामुळे चिदंबरम यांच्या मागे विरोधी पक्षांनी राजीनामा देण्याचा ससेमिरा लावला आहे. तर जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे चिदंबरम यांची कोंडी केली आहे.

त्यातच २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी एआयडीएमकेचे उमेदवार आ.एस.कन्नपन यांचा शिवगंगा मतदारसंघात निसटता पराभव केला होता. मात्र चिदंबरम यांनी हा विजय मतपत्रिकांमध्ये हेराफेरी करून मिळविल्याचा दावा करीत कन्नपन यांनी मद्रास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. यासंदर्भात कन्नपन यांनी २९ तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर या आक्षेपांमध्ये तथ्य नसल्यामुळे सदर खटला रद्दबातल ठरविण्याची विनंती करणारी याचिका चिदंबरम यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली. ही याचिका उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. इतकेच नव्हे तर सदर खटल्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायमूर्तींनी चिदंबरम यांना दिले.

चिदंबरम यांना हा मोठा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधकांनी आधीच मेटाकुटीस आलेल्या चिदंबरम यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एआयडीएमके पक्षाच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चिदंबरम यांनी राजीनामा न दिल्यास त्यांची केंद्र सरकारमधून हकालपट्टी करावी, असेही त्या म्हणाल्या. तर भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी चिदंबरम यांनी नैतिकतेची चाड ठेवून राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे. डॉ. स्वामी यांनीही चिदंबरम यांच्यावर टीका करून, त्यांच्या तत्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान कॉंग्रेसी संस्कृतीप्रमाणे झाल्याप्रकाराची सारवासारव करून चिदंबरम यांची पाठराखण कऱण्यासाठी पक्षातर्फे केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद व पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांना पुढे करण्यात आले. भाजपा नेते दररोज चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असतात. तेव्हा त्यांनी राजीनामा देण्याची काहीही गरज नसल्याचा युक्तीवाद खुर्शीद यांनी केला. तर नारायणसामी यांनी विरोधी पक्षांच्या दबावाला चिदंबरम यांनी बळी पडू नये, कारण हे पक्ष या मुद्याचे राजकारण करीत आहेत, असे सांगितले.    

Leave a Comment