आय.टी.कंपन्यांची कॅम्पस भरती यंदा सप्टेंबरमध्ये ?

चेन्नई दि.९-यंदाच्या वर्षी आय.टी.कंपन्यांनी आपली कॅम्पस भरती सप्टेंबरपर्यंत लांबविली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.इंजिनिअरिंग कॉलेजातून यंदा मुलाखतींसाठी जाण्यास कांही महत्त्वाच्या बाबींमुळे वेळ मिळाला नसल्याचे कारण यामागे असल्याचे सांगितले जात असले तरी अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागतिक मंदीची झळ आय.टी.कंपन्यांनाही आता जाणवू लागली असल्याने कॅम्पस मुलाखती उशीरा घेण्याकडे कंपन्यांचा कल आहे.

प्रत्येक वर्षी भारतात विविध शाखांतून १० लाख इंजिनिअर्स पास होऊन बाहेर पडतात. त्यातील सुमारे दोन लाख जणांना आय.टी.कंपन्यंातून नोकर्‍या मिळतात. २०१० सालात १लाख ७० हजार तर २०११ सालात २ लाख अभियंत्यांना कॅम्पस मुलाखतीतूनच आय.टी.त नोकर्‍या मिळाल्या होत्या. नॅसकॉमने यंदाही दोन लाख इंजिनिअर्सची भरती आयटी क्षेत्रात होईल असा अंदाज व्यक्त केला असला तरी पश्चिमेतील आर्थिक मंदी आयटी क्षेत्राला नक्कीच जाणवते आहे. यंदा आयटी क्षेत्राची निर्यातही कमी होईल असे संकेत मिळत आहेत. युरोपचा कर्जबाजारीपणा, मध्यपूर्वेतील राजकीय अशांतता व अमेरिकेने तंत्रज्ञान खर्चात केलेली कपात याचा विपरित परिणाम आयटी क्षेत्रावर जाणवत असल्याचे व पर्यायाने त्यांचे उत्पादन घटल्याचे जाणकार सांगत आहेत.

यामुळेच यंदा नवीन भरती करताना आयटी कंपन्या अधिक काळजी घेत असून आणखी दोन तीन महिने जाऊ दिल्यानंतरच अभियांत्रिकी महाविद्यालयातून भरती करायची का नाही याचा निर्णय घेतला जाईल असे या सूत्रांकडून समजते.

Leave a Comment