दहशतवादी सिद्दिकीच्या खुनाच्या कारणाचे गूढ कायम – मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बिहारला रवाना

पुणे, दि. ९ – येरवडा कारागृहात काल खून करण्यात आलेला इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी मोहम्मद कातील सिद्दीकी याच्या मृतदेहाची आज ससूनमध्ये उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याचा मामेभाऊ शेख महम्मद अफरोज सिद्दीकी याच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आला. मुंबई मार्गे विमानाने पाटणा आणि तेथून रात्री उशीरा दरभंगा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बंगळूर, चेन्नई येथे झालेले बॉंबस्फोट, दिल्ली येथील जामा मशिदीसमोर झालेला गोळीबार आणि श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोर बॉंब ठेवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिद्धीकी याला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी असलेला कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार आलोक भालेराव या दोघांनी काल सकाळी दोरीने गळा आवळून खून केला. संपूर्ण कारागृह पोलीस दलापासून शासनापर्यंत सर्वत्र खळबळ उडविणार्‍या या घटनेबाबत आज दिवसभर शहरात उलटसुलट चर्चां सुरू होत्या. ‘सिद्धीकी याने देशविघातक कृत्य केल्यानेच आम्ही त्याला ठार मारले’, असे शरद मोहोळ म्हणत असल्याच्या वृत्तापासून पोलिसांनीच कट करून त्याची सुपारी देऊन खून करवला, इथपर्यंत अनेक प्रकारच्या अफवा आज दिवसभर शहरात उमटत होत्या.

दरम्यान सिद्दीकी याच्या खुनाची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचा मामेभाऊ शेख महम्मद अफरोज सिद्दीकी हा आज सकाळी पुण्यात आला. तो मुंबई येथील धारावी परिसरात राहतो. काल वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहून आपल्याला सिद्दीकी याचा खून झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर काही वेळाने त्याचा भाऊ शकिल याने फोनवरून संपर्क साधून आपल्याला हीमाहिती दिली. त्यानुसार सर्व कुटुंबियांशी चर्चा करून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आपण आलो आहोत, असे अफरोज याने सांगितले. सिद्दीकी हा विवाहीत असून त्याला दोन मुली आहेत. पहिली पत्नी त्याला सोडून गेली असून, दुसरी पत्नी सध्या दिल्ली येथे राहते, असे त्याने सांगितले.

दिल्ली येथे सिद्दीकी याचे शिक्षण झाले असून, तेथेच तो छोट्या विद्यार्थ्यांचे क्लासही घेत होता. आपण गेल्या ३ ते ४ वर्षांपूर्वी त्याला भेटलो होतो. त्यानंतर त्याची भेट झाली नाही. कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधीत तो काम करत असेल आम्हाला कधीही वाटले नव्हते. दिल्ली, बंगळूर, हैदराबाद अशा वेगवेगळ्या शहरांत झालेल्या बॉंबस्फोटाशी त्याचा संबंध जोडून विनाकारण पोलिसांनी त्याला अटक केली. गेले ४ ते ५ महिने त्याला या सगळ्या शहरांतून फिरवले. त्याचा कुठेही संबंध दिसून येत नव्हता. सबळ असा पुरावा कुठेही पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनीच कट करून त्याचा खून केल्याचा आरोप अफरोज याने केला. काल त्याची न्यायालयीन कोठडीची मुदत संपत होती. त्यानंतर लगेच त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार होते. तत्पूर्वीच पोलिसांनी त्याचा खून करवला असा गंभीर आरोप त्याने यावेळी केला.

अफरोजच्या आरोपात संदिग्धता
मोहंमद कातील सिद्दीका याच्या खुनाबाबत त्याचा मामेभाऊ अफरोज याने पोलिसांवर आरोप केले; मात्र त्यातही दोन वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्याने दोन्ही वेळा वेगवेगळे आरोप केले. त्यामुळे त्याच्या आरोपतील सत्यता फोल ठरली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या अफरोज याच्याशी पत्रकारांनी चर्चा केली असता ‘या खून प्रकरणात एटीएसची चूक नसून गुप्तचर यंत्रणेने (आयबी) सुपारी देऊन सिद्दीकी याचा खून घडवून आणला आहे’, असा आरोप केला. त्यानंतर ससून येथील शवागारासमोर पुन्हा पत्रकारांनी त्याच्याशी बातचित केली; त्यावेळी त्याने आयबीचा उल्लेखही केला नाही. एटीएसनेच पुरावे नसल्याने सिद्दीकीचा काटा काढला, असा आरोप त्याने केला.

Leave a Comment