कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदाराकडून कुख्यात दहशतवादी सिद्दीकीची येरवडा जेलमध्ये गळा दाबून हत्या

पुणे, दि. ८  –  इंडियन मुजाहिदीन संघटनेचा कुख्यात दहशतवादी महम्मद कातील सिद्दीकी याचा `मोहोळ गँग’च्या कैद्यांनी शुक्रवारी (दि. ८) पुण्यातील येरवडा जेलमध्ये खून केल्याने खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि अलोक भालेराव या साथीदाराने पायजम्याच्या नाडीने गळा दाबून सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा खून केला. जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणात त्याचा हात असल्याच्या संशयावरुन तसेच दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून सिद्दीकीला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर चौकशीसाठी त्याला पुण्यात आणण्यात होते. सिद्दीकी हा पुणे, दिल्ली आणि बेंगलोर बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित होता. सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

सिद्दीकीला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे त्याला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. याच सेलमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांनाही ठेवण्यात आले होते. मोहोळने नोव्हेंबर २०११ मध्ये दासवे गावचे सरपंच शंकरराव धिंडले यांचे अपहरण करून ४५ लाख रूपये खंडणी घेतल्याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने मोहोळ आणि भालेराव यांना अटक केली होती. या दोघांशी महम्मद सिद्दीकीचे सकाळी पावणे नऊच्या सुमारास वाद झाले. त्यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. या मारहाणी दरम्यान गुंड मोहोळ आणि भालेरावने सिद्दीकीचा पायजम्याच्या नाडीने गळा आवळला. जबर मारहाण करत गळा आवळल्याने त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

सिद्दीकी याचा १३ फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बाबस्फोटात हात होता. तसेच त्याने दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्नही केला होता. दिल्ली आणि बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम बॉम्बस्फोटातही सिद्दीकीचा सहभाग असल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी गेल्या महिन्यात इंडियन मुजाहिदीनच्या सहा संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यात अटक करण्यात आलेल्या महम्मद सिद्दीकी याने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरातही बॉम्बस्फोट घडविण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली होती. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या दिवशी दुपारी यासीन हा सिद्दीकीला येऊन भेटला. त्याने सिद्दीकीकडे एक बॅग दिली होती आणि दुसरी बॅग स्वत:कडे ठेवली होती. यासीनचे जर्मन बेकरीतील फुटेज तसेच त्यात यासीनच्या पाठीवर असलेली बॅगही सिद्दीकीने ओळखली. सिद्दीकी ती बॅग घेऊन दगडूशेठ मंदिराजवळ आला. तेथे असलेल्या एका फुलवाल्याकडे त्याने ती बॅग ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या फुलवाल्याने बॅग ठेऊन घेण्यास असमर्थता दर्शवली.

त्याच सुमारास डेव्हिड कोलोमन हेडली प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर दगडूशेठ गणपती मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती. कोणत्याही भक्ताचे सामान ठेवून न घेण्याच्या सूचना फुलवाल्यांना देण्यात आल्या होत्या. संबंधित फुलवाल्याने त्याचेच तंतोतंत पालन केले. फुलवाल्याच्या जागरूकपणामुळेच दगडूशेठ मंदिराबाहेरील बॉम्बस्फोट टळू शकला. त्याचबरोबर त्यातील सिद्दीकीचा सहभागही समोर आला होता.

सिद्दिकीची हत्या झाल्याने बरेचशे प्रश्‍न अनुत्तरीत राहिल्याचे बोलले जात आहे. सिद्दीकी हा `इंडियन मुजाहिदिन’ या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी होता. २०१० मध्ये जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉंबस्फोटातील तो प्रमुख आरोपी होता. ‘इंडियन मुजाहिदीन’ या संघटनेचे दक्षिण भारतात ‘पॉकेट’ असून ते सक्रिय आहे. खुनामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, येरवडा कारागृहात दिवसाढवळ्या झालेल्या या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कुख्यात गुंड मोहोळची पार्श्‍वभूमी-
पुण्यामध्ये मारणे आणि मोहोळ या गुंडांमध्ये नेहमीच टोळीयुद्ध व्हायचे. या टोळी युद्धातूनच २००६ मध्ये मारणे गटाने मोहोळ टोळीचा प्रमुख संदीप मोहोळचा खून केला. संदीप मोहोळच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून शरद मोहोळने टोळीची जबाबदारी स्वीकारली. त्याने २०१० मध्ये किशोर मारणेचा खून केला. तसेच नोव्हेंबर २०११ मध्ये दासवे गावचे सरपंच शंकरराव धिंडले यांचे अपहरण करून ४५ लाख रूपये खंडणी घेतली होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने मोहोळ आणि भालेराव यांना अटक केली होती. मोहोळवर खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण यासारखे गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.
    
सिद्दीकीला मारण्याचा कट ?
जर्मन बेकरी, बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम तसेच दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील सिद्दीकी हा एक महत्त्वाचा साक्षीदार होता. त्याने आपल्या जबानीत महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. त्यामुळेच त्याच्या खून केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment