साहित्य महामंडळाचा नामुष्की ओढवणारा निर्णय

मुंबई।  मराठीच्या साहित्याचा गजर जगात घुमू देण्याच्या वैश्विक भूमिकेचा डिमडिम गेली तीन वर्षे वाजविणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मृगाच्या पहिल्याच दिवशी टोरांटोकरांवर गरजले. आणि ऑगस्ट महिन्यात होणारे विश्व साहित्य संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला!!

हे संमेलन रद्द करावे का, असा विचार पुढे आला पण असे करणे योग्य होणार नसल्याने ते पुढे ढकलण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली. महामंडळाच्या येथे आज झालेल्या बैठकीत परंपरा भेदणारा व साहित्य क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, महामंडळ सदस्य व पुणे मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष माधवी वैद्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबादचे कौतिकराव ठाले पाटील, महामंडळाचे कोषाध्यक्ष गुरूनाथ दळवी, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे आदी उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी महामंडळाला पत्र पाठवून आपले म्हणणे कळविल्याने ते सभेला आले नाहीत.

कॅनडामधील टोरांटो येथे ३, ४ व ५ ऑगस्ट रोजी चौथे विश्व साहित्य संमेलन होणार होते. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विख्यात कवी ना.धों. महानोर यांचे नावही जाहीर झाले आहे. पण सुरुवातीपासून टोरांटो संमेलनाच्या आयोजनात विघ्ने येत आहेत. आज त्याचा कडेलोट झाला एवढेच!

टोरांटोच्या मराठी भाषक मंडळाने या संमेलनाचा सुकाणू हाती घेतला आहे. पहिले काही महिने महामंडळ व त्यांच्यात चांगला समन्वय होता. पण जेव्हा संमेलनाचा खर्च व साहित्यिकांचे मानपान त्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले, तेव्हा त्या मंडळाने एक सभा घेऊन खर्चाचे गाडे झेपणार नाही, खर्च महामंडळाने विभागून घ्यावा अशी विनंती केली होती.

Leave a Comment