राज्यात मान्सून दाखल कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी

पुणे, दि. ६ – तब्बल पाच दिवसांच्या विलंबानंतर केरळमध्ये धडकलेला मान्सून अवघ्या  एका दिवसात महाराष्ट्रात दाखल झाला आहे. संपूर्ण गोवा, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग मान्सूनने व्यापला आहे. यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.

मंगळवारी केरळमध्ये दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस आणखी उत्तरेकडे सरकला असून त्याने अरबी समुद्र, दक्षिण भारत आणि संपूर्ण ईशान्य भारतातही प्रवेश केला आहे. राज्यात गोव्यासह दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली.

मान्सूनच्या पहिल्याच दिवशी कोकणात वैभववाडी येथे ८ मि.मी., पणजीमध्ये ७ मि.मी., काणकोण येथे ६ मि.मी. तर पोलादपूर, म्हापसा, मार्मागोवा, पेडणे आदी ठिकाणी प्रत्येकी ५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक गगनबावडा येथे ९ मि.मी., कडेगाव येथे ५ मि.मी. तर भुदरगड, आटपाडी, महाबळेश्‍वर येथे प्रत्येकी ४ मि.मी. पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे.

येत्या ४८ तासात कोकण गोव्यात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.