महिलांची अवहेलना

आपल्या देशात शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. शहरे वाढत आहेत. शहरांत राहणारे लोक शहाणे आणि समंजस असतात तेव्हा समाजातला समंजसपणा वाढायला हवा. पण या दोन गोष्टींबरोबरच समाजात महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्कार यांचीही संख्या वाढत आहे. या गोष्टीला आणखी एक काळी किनार आहे. महिलांवरील केवळ अत्याचारच वाढत आहेत असे नाही, तर अशा अत्याचाराच्या प्रकरणात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण त्याच वेगाने कमी होत आहे.  या संबंधातला सारे आकडे  मनाला अस्वस्थ करणारे आहेत पण  ही स्थिती बदलावी, अत्याचार कमी व्हावेत, आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढावे यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला हवेत ते अस्वस्थ होत नाहीत ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे स्थिती वरचेवर बिकट होत आहे. महिला विविध क्षेत्रात कार्यरत होत आहेत आणि त्या निमित्ताने घराबाहेर पडून समाजात मिसळत आहेत; पण त्या त्याच प्रमाणात असुरक्षित होत आहेत आणि त्यांच्यावर अत्याचार करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत. गुन्हेगारीविषयीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकड्यांत या गंभीर स्थितीचे प्रतिबिंब पडलेले दिसत आहे. २०१० आणि २०११ सालचे आकडे समोर आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत गेल्या २० वर्षांपासून देशाची राजधानी आघाडीवर आहे. ती देशाची आणि महिला अत्याचारांचीही राजधानी झालेली आहे. या शहरात २०१० साली बलात्काराची ४१४ प्रकरणे विविध पोलीस ठाण्यांत नोंदण्यात आली होती. त्या वर्षी या प्रकारांची मोठीच चर्चा झाली आणि हे प्रमाण कमी होण्यासाठी काही तरी केले पाहिजे असे जोरदार मतप्रदर्शन करण्यात आले. सरकारनेही काही तरी करण्याचे आश्‍वासन दिले पण प्रत्यक्षात हे प्रमाण कमी न होता २०११ साली ते वाढले. त्या वर्षी शहरांत बलात्काराच्या ५६८ प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत २०१० साली १९४ तर २०११ साली २१८ प्रकरणे नोंदली गेली. मुंबईच्या पाठोपाठ पुणे,जयपूर, भोपाळ ही शहरे महिलांसाठी असुरक्षित असल्याचे दिसून आले. या बाबत मध्य देशाचा क्रमांक अव्वल राहिला.  या राज्यात २०११ साली १५ हजारावर बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली. बंगालात १२ हजारावर प्रकरणांची नोंद होऊन त्याचा दुसरा क्रमांक राहिला. या संबंधात कमी अधिक  प्रमाणात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांनी  स्थान पटकावले. अशी आकडेवारी वाढत का आहे? याचा शोध घेतला असता असे लक्षात येते की, बलात्काराच्या प्रकरणांत शिक्षा होण्याचे प्रमाण कमी होत आहे. शंभरातले  चारही आरोपी शिक्षा भोगत नाहीत. ९७ टक्के आरोपी निर्दोष सुटतात. या मागे दोन मुख्य कारणे आहेत. एक सामाजिक आहे. आपल्या समाजात महिला आणि पुरुषांकडे बघण्याचा दृष्टीकोन निरनिराळा आहे. एखाद्या बाईवर बलात्कार झाला असेल तर समाज तिला अपवित्र समजतो. मात्र बलात्कार करणाराला असला कसलाही कलंक लागत नाही. स्त्री कडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याची आपली वृत्ती काही बदलत नाही. त्यामुळे एखाद्या पुरुषाने बलात्कार केला असेल तर ते त्याच्या पुरुषार्थाचे लक्षण मानले जाते.  म्हणून बलात्कार झालेली महिला मुळात आपल्यावरच्या अत्याचाराची पोलिसांत नोंदच करीत नाही. बाईवर बलात्कार झाला असेल तर तिच्याच वागण्यात काही तरी  चवचालपणा असेल असे सरळ सरळ म्हटले जाते. आपली  पोलीस यंत्रणा आणि न्यायदानाची पद्धत अशी काही विचित्र आहे की बलात्कार झाल्यानंतर निमूटपणे आपला अपमान मनातल्या मनात ठेवणेच बरे असे तिला वाटते कारण त्यावर पोलिसात जाणे आणि न्याय मागणे हे त्यापेक्षा अधिक अपमानास्पद असते. आपल्या पोलीस ठाण्यात बलात्कारित बाईलाच एखाद्या आरोपीप्रमाणे वागवले जाते कारण बलात्कार झाला तर त्याला बाईच जबाबदार असते असे पोलीसही मानत असतात.  याबाबत तहेलका या नियतकालिकाने दिल्लीतल्या काही पोलीस ठाण्यातल्या अधिकार्‍यांशी चर्चा केली असता त्यातल्या बहुसंख्य अधिकार्‍यांनी बलात्कार असा काही प्रकारच नसतो असे म्हणून हात झटकले. आपल्या पर्यंत आलेल्या १०० प्रकरणात बलात्कार अशी नोंद केली गेली तरीही त्यातली ९० प्रकरणे उभयतांच्या संमतीने केलेल्या संबंधांची असतात आणि संबंधित महिला त्या पुरुषाकडून पैसे वसूल करण्यासाठी बलात्काराची खोटी फिर्याद दाखल करीत असते असे बहुसंख्य पोलिसांनी सांगितले. पोलिसांचा हाच दृष्टीकोन असेल तर मग अशा महिलांना हे पोलीस न्याय कसा मिळवून देतील असा प्रश्‍न आहे. काही पोलिस एखादी बाई तक्रार द्यायला आलीच तर सगळ्या पोलिसांसमोर आणि  समोरच्या पुरुषांसमोर तिला बलात्काराच्या क्रियेविषयी असे काही प्रश्‍न विचारतात की तिला त्या प्रश्‍नांची उत्तरे देणे अशक्य होते. र्लैगिक संबंधाविषयी जी बाई आपल्या आईशीही मोकळेपणाने बोलत नाही तिला आपल्याशी झालेल्या अतिप्रसंगाचे वर्णन असे सार्वजनिक रित्या करायला सांगून तो पोलीस तिला कसला न्याय मिळवून देणात असतो ? अशा काही अमानुष समजुती आणि पूर्वग्रह यामुळे आरोपींना शिक्षा होत नाहीत आणि ते मोकाट सुटल्याने आरोपांचे प्रमाण वाढते.