
पुणे, दि. ८ – यापूर्वी मी भूमीगत मेट्रोचा पुरस्कर्ता होतो, मात्र त्यासाठी लागणारा तिप्पट ते चौपट जादा खर्च आणि त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशाला बसणारी झळ यामुळे हा निर्णय मी बदलला अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शहरातील वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मेट्रोचा आणखी विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येइल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संचेती चौकात महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शहरातील पहिल्या ग्रेडसेप्रेटरचे उदघाटन शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार अनिल भोसले, बाप्पूसाहेब पठारे, महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दिपक मानकर, महापालिका आयुक्त महेश पाठक, महापालिकेतील कॉग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, स्थानिक नगरसेविका रेश्मा भोसले, निलिमा खाडे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, दत्तात्रय बहिरट आदी याप्रसंगी उपस्थित होते.
शहरातील वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी भूमीगत मेट्रो व्हावी यासाठी आपण प्रयत्न केला, असे सांगून पवार म्हणाले; भूमीगत मेट्रोसाठी मी वैयक्तिक आग्रही होतो त्यासाठी विविध तज्ञांशी त्याबाबत चर्चा केली मात्र भूमीगत मेट्रो प्रकल्प राबविल्यास इतर मेट्रो प्रकल्पापेक्षा त्यासाठी तिप्पट ते चौपट जादा खर्च करावा लागणार होता. त्यामुळे आपोआप तिकिटदर वाढून त्याची झळ पुणेकरांना बसणार होती, ही बाब लक्षात घेउन भूमीगत मेट्रोचा विचार मी सोडून दिला.
शहरातील वाहतूककोंडीची समस्या लक्षात घेता मेट्रो प्रकल्प होणे ही काळाची गरज आहे, सध्या अडीच हजार कोटी रुपये खर्च करुन वनाज ते रामवाडी या अंतरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १५ थांबे बांधण्यात येणार असून डेपोच्या जागेची पाहाणी करण्यात येत आहे, मात्र एवढ्यावरच न थांबता हा पुढील टप्प्यात हा प्रकल्प चंदननगर, खराडी, विमानतळ, चांदणी चौक आणि पिंपरी-चिंचवड पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्याच्या आणि पुढील टप्पा यशस्वी व्हावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
इंजिनिअरिंग कॉलेज चौकातील उड्डाणपूल लवकरच
इंजिनिरिंग कॉलेज चौकातील उड्डाणपूलाचे काम सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल असे सांगून पवार म्हणाले; या कामात काही अडथळे येत असतील तर त्याबाबत संबधितांशी चर्चा करुन त्यावर तातडीने मार्ग काढण्यात येइल. मात्र विकासकामे करत असताना कोणालाही दुखावण्याची आमची भावना नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
जुन्या विकास आराखड्याबाबत लवकर निर्णय घ्या
शहराचा जुना विकास आराखडा सध्या महापालिकेच्या शहर सुधारणा समितीकडे आहे, हा आराखडा येत्या ३० जूनपूर्वी मंजुर व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे यांनीही त्यासाठी प्रयत्न करुन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे हा विकास आराखडा येत्या ३० जूनपूर्वी मंजुर करणे राज्य शासनाला शक्य होणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.