जम्मू दि.६- भारतीयांच्या मनात अतिशय पवित्र स्थान असलेल्या अमरनाथ यात्रेचा कालावधी पूर्ववत दोन महिने करावा यासाठी विश्वहिंदू परिषद आणि विविध संघटनांनी जम्मूत जोरदार निदर्शने केली तसेच अमरनाथ यात्रा बोर्डाचे अध्यक्ष व राज्यपाल व्होरा यांची हकालपट्टी केली जावी अशीही मागणी करण्यात आली. अमरनाथ यात्रा यंदा २५ जूनपासून सुरू होत आहे.
खराब वातावरण आणि भाविकांसाठी सोयीसुविधा न झाल्याने यंदा अमरनाथ यात्रेचा कालावधी दोन महिन्यांवरून ३९ दिवसांवर आणण्यात आला आहे. देशभरातून यंदा सुमारे तीन लाख भाविकांनी या यात्रेसाठी नोंदणी केली असून वर्षातून एकदाच श्रावण महिन्यातच ही यात्रा केली जाते. विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरिंदर जैन यासंबंधी बोलताना म्हणाले की भाविकांची सोय हे कारण नसून खरे कारण फुटिरतावाद्यांकडून येत असलेले दडपण हे आहे. यात्रा कालावधी पूर्ववत करावा यासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांनाही मध्यस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खराब हवामान असेल तर ते सुधारल्यानंतर यात्रा सुरू करावी पण ती दोन महिनेच असावी अशी मागणी विहिप बरोबरच काश्मीरी पंडित संघटनेनेही केली आहे. अन्य धर्मिय वर्षात हवे तेव्हा त्यांच्या धर्मस्थळांच्या यात्रा करू शकतात मग वर्षातून एकदाच ठराविक काळात होणारी ही यात्रा कमी करण्याचे कारण काय असा त्यांचा सवाल आहे.