अण्णांच्या जनजागृती आंदोलनाची ठाण्यात सांगता

ठाणे, दि. ७ – भ्रष्टाचार करणार्‍यांना जन्मठेप ठोठवा, अशी मागणी समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाण्यात केली. सरकारी विश्रामधाम येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. अण्णा हजारे यांनी राज्यात भ्रष्टाचार जनजागृती आंदोलन सुरू केले होते त्याची सांगता गुरूवारी ठाण्यामध्ये अण्णांच्या जाहीर सभेने झाली.  

देशातील जनता या देशाचे मालक असून त्यांना कुठल्याही निर्णयात सामील करून न घेता मंत्रालयात परस्पर निर्णय घेतले जातात म्हणून भ्रष्टाचार करणार्‍यांचे फावत आहे, याची जाणीव जनतेला करून देण्यासाठी मी राज्यात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या मेहनतीचा पैसा ७५ टक्के हा पगार सरकारी बंगले यावरच खर्च होत असून, २५ टक्के पैसा भ्रष्टाचारावर खर्च होत आहे. मग या देशाचा विकास कसा होणार असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सगळीकडे साखळी पद्धतीने भ्रष्टाचार सुरू असून त्यामुळे कोणावरच कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले. या देशात असेच चालणार असेल तर या देशाचे भविष्य अंधारमय राहिल असे ते म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष उलटूनही विदर्भ, मराठवाडयातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते, ही शरमेची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. दरवर्षी करोडो रूपये सिंचनावर खर्च करूनही एकही प्रकल्प पूर्ण होत नाही. वर्षानुवर्ष एकाच कंपनीला धरणाची कामे कशी मिळतात याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.

राज्यात सहकार चळवळ लयाला गेली असून सहकारी कारखाने मोडीत काढून त्याचे खाजगीकरण करण्याचा कुटील डाव असल्याचे ते म्हणाले.

भ्रष्टाचार संपवायचा असेल तर केंद्रात लोकपाल व राज्यामध्ये लोकआयुक्त असणे गरजेचे आहे. २०१४ साली लोकसभेच्या निवडणुकीत जनताच या प्रश्‍नी निर्णय लावेल असे ते म्हणाले. भ्रष्टाचार मुक्त करण्याची सरकारची इच्छा नसल्याचे सांगून सीबीआयला स्वतंत्रता देण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रीय मंत्री चिदंबरम यांच्या बाबतीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले की, आज लोकपाल विधेयक असते तर चिदंबरम गजाआड दिसले असते. आपण कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसल्याचे अण्णांनी शेवटी स्पष्ट केले.

दरम्यान, अण्णा हजारेंची पत्रकार परिषद सुरू असताना युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या बाहेर निदर्शने केली. त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.