यामाहाची जगातील सर्वात स्वस्त बाईक प्रथम भारतात

यामाहा या दुचाकी उत्पादनातील नामवंत व अग्रणी जपानी कंपनीने जगातील सर्वात स्वस्त मोटरसायकल बाजारात आणण्याची जोरदार तयारी सुरू केली असून केवळ २७ हजार ५०० रूपयांत ही बाईक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या बाईकची किंमत जाहीर केली गेली असली तरी नांव मात्र अद्यापी गुलदस्त्यातच आहे.

यामाहा मोटर्स इंडियाचे सीईओ हिरोयुकी सुझुकी याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की भारतीय बाजारात कमी किमतींच्या मोटरसायकल्सना प्रचंड मागणी आहे हे लक्षात घेऊन आम्ही ही बाईक तयार करत आहोत आणि ती सर्वात प्रथम भारतीय बाजारातच विकण्याचा आमचा निर्णय आहे. कॉम्प्युटर बाईक श्रेणीतील क्रक्स व वायबीआर या ११० सीसीच्या बाईक्स यामाहाने यापूर्वीच बाजारात आणल्या आहेत. त्यातील क्रक्स ही बाईक ३८ हजार ४०० रूपयांत उपलब्ध आहे. भारतापाठोपाठ अफ्रिकेतील बाजारपेठेत नवी स्वस्त बाईक उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सध्या बाजारात अनेक नामवंत कंपन्यांच्या स्पर्धात्मक किंमतीच्या बाईक्स उपलब्ध आहेत तर कांही कंपन्या स्वस्त बाईक तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. होंडाची ड्रीम युग, बजाजची नवी डिस्कव्हर, सुझुकीची हयाते, हिरो मोटोकॉर्पची सीडी डॉन या बाईक बाजारात असून त्यातील सीडी डॉन ही सर्वात स्वस्त बाईक आहे. तिची किंमत आहे ३६ हजार रूपये. यामाहाच्या नव्या स्वस्त बाईकमुळे मात्र सीडी डॉनला स्पर्धा निर्माण होणार आहे व हिरोपुढे त्यामुळे मोठे आव्हानही निर्माण होणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

Leave a Comment