महाराष्ट्रात चार नवीन अभयअरण्यांची निर्मिती

मुंबई, दि. ८ – राज्यातील नवीन बोर, नवीन नागाझिरा, नवीन नवेगाव अशा एकूण ५१० चौरस कि. मी. क्षेत्राच्या चार अभयअरण्यांची निर्मिती आणि ताडोबा ते नवेगावमधील उरमेड येथील अभयारण्यास मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले.

बुधवारी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची सहावी बैठक मुख्यमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस वनमंत्री डॉ. पतंगराव कदम उपस्थित होते. प्रारंभी वन विभागाचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी स्वागत केले.

वन्यजीव संरक्षित क्षेत्रातून एच्छिक पुनर्वसन होण्यास तयार असलेल्या गावांमधील कुटुंबांच्या पुनर्वसनाला गती देण्याकरीता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या पुनर्वसन धोरणप्रमाणे राज्य शासनाच्या अर्थसंकल्पित अनुदानातून आणि कॅम्पा तसेच १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पुनर्वसनासाठी १० लाख रुपयांचे पॅकेज देण्याचे मान्य करण्यात आले. या पॅकेजप्रमाणे नवेगाव, टिपेश्‍वर आणि कोलसा गावात तसेच इतर गावातील पुनर्वसित होणार्‍या लोकांना लाभ होणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कोपेला कोलामार्का हे रानम्हशींचे अस्तित्व असलेले जगातील एकमेव ठिकाण आहे. या ठिकाणच्या वनक्षेत्राला कन्झवेंशन रिझर्व्ह जाहीर करण्याची शिफारस या बैठकीत करण्यात आली. त्याचबरोबर वन्यजीव क्षेत्रात तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत असणार्‍या वनक्षेत्रपालांना वन्यप्राणी संरक्षणार्थ १०० अतिरिक्त वाहनांचा पुरवठा करण्यासाठी या बैठकीत मान्यता दिली गेली. त्याचबरोबर मुंबईला आवश्यक पिण्याच्या पाण्याकरीता गारगाई नदी प्रकल्पासाठी सर्वेक्षण आणि तपास कार्याची शिफारस करण्यात आली. या प्रकल्पातर्गत वन्य प्राण्यांना अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी वन्य रेल्वे व रस्ते पार करण्यासाठी उपयुक्त नैसर्गिक भ्रमणमार्ग किंवा भुयारी मार्ग करण्याची शिफारस करुन राष्ट्रीय वन्य प्राणी संरक्षण मंडळाकडे सादर करण्याचे ही सूचित करण्यात आले.  

Leave a Comment