टॅबलेटच्या बाजारात ऍपलचा आयपॅडच सरस

मुंबई, दि. ८ –  मोबाईल बाजारात टॅबलेट पीसीची मागणी दिवसागणिक वाढत आहे. ऍमेझोन, सॅमसंग यासारख्या कंपन्यांनी टॅबलेट पीसी आणले असले तरी ऍपलचा आयपॅडच इतर टॅबलेटच्या तुलनेत सरस ठरला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहित आयपॅड जागतिक बाजारात अव्वल ठरला आहे.

चालू वर्षातील पहिल्या तिमाहित जागतिक बाजारात तब्बल १ कोटी ८२ लाख टॅबलेट पीसीची विक्री झाली. यात ऍपलच्या आयपॅडची सर्वाधिक विक्री झाली आहे. एकूण विक्रीमध्ये आयपॅडचा वाटा तब्बल ६५ टक्के आहे. याच तिमाहित कंपनीने आयपॅडचा तिसरा अवतार बाजारात आणला होता. तसेच आयपॅडच्या किंमतीही कमी केल्या होत्या. याचा मोठा फायदा विक्री वाढण्यात झाला. वर्षाच्या पहिल्या तिमाहित ऍपलने १ कोटी १८ लाख आयपॅडची विक्री केली, तर आयपॅडला बाजारात आणल्यापासून कंपनीने जगभरात तब्बल ६ कोटी ७० लाख आयपॅड विकले.

आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगनेही गॅलेक्सी हा टॅबलेट बाजारात आणला होता. मात्र, पहिल्या तिमाहित कंपनीला ऍपलला मागे टाकता आले नाही. या तिमाहित कंपनीने १ कोटी १० लाख गॅलेक्सीची विक्री केली. मात्र कंपनीने ऍमेझोनच्या किंडल फायर ला सहज मागे टाकले. त्याचबरोबर टॅबलेटची विक्री करणा-या रिसर्च इन मोशन (रिम) व लिनेव्हो या दोन बडया कंपन्यांना या तिमाहित विक्री वाढविण्यात यश आले आहे. या तिमाहित या कंपन्यांच्या विक्रीत अनुक्रमे २३३ टक्के व १०७ टक्के वाढ झाली.

सध्याची टॅबलेटची मागणी पाहता डेल, एचपी व एलजी या कंपन्यांकडून टॅबलेटमध्ये आणखी संशोधन करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या कंपन्यांकडून ४.० व्हर्जन असलेल्या ऍड्रॉइट टॅबलेट बाजारात आणला जाणार आहे. यामध्ये विंडोज चा समावेश असणार आहे.

Leave a Comment