अल कायदाला हवेत आत्मघातकी बॉम्बर्स

बगदाद दि.७- आत्मघातकी बॉम्बर्सना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांची भरती करण्यासाठी कुप्रसिद्ध दहशतवादी संघटना अल कायदाने इंटरनेयवर जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्याचे समजते. या जाहिरातीत अमेरिका, इस्त्रायल, फ्रान्स व ब्रिटनवर हल्ला करू शकणारे बॉम्बर्स पाहिजेत असा स्पष्ट उल्लेखही करण्यात आला आहे. अनेक जिहादी वेबफोरमच्या माध्यमातून या जाहिराती देण्यात आल्या असून संबंधितांनी किंवा इच्छुकांनी ईमेल वरच संपर्क करावा अशा सूचनाही त्यात देण्यात आल्या आहेत.

या जाहिरातीतील मजकूर असा की इस्लामविरोधी शत्रूंना ठार करण्यासाठी किंवा त्यांच्या कत्तली करण्यासाठी आपण आपल्या धर्मबंधूंना मदत करणे हाच आपला मुख्य हेतू असून त्यामुळे एकेकट्याने हे काम करू इच्छिणार्‍या सर्वांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. शत्रूच्या आर्थिक, लष्करी तसेच प्रसारमाध्यमांना आपण आपले टार्गेट बनविणे त्यासाठी आवश्यक असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. अमेरिका, इस्त्रायल, फ्रान्स व ब्रिटन हे आपले पहिले शत्रू असल्याचेही त्यात म्हणण्यात आले आहे.

यापूर्वीही अल कायदा किंवा त्यांच्याशी संबंधित अन्य जिहादी संघटनांनी इंटरनेट फोरमचाच वापर केलेल्या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी अथवा त्यांच्या समर्थकांशी संवाद आणि संपर्क साधण्यासाठी केलेला आहे हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.