कारग्राहक करताहेत खरेदीपूर्वी ऑनलाईन रिसर्च

मुंबई दि.७- इंटरनेटच्या महाजालाचे परिणाम आज आपण पाहतो आहोतच. इंटरनेटवरून शॉपिंग करणार्‍यांचे प्रमाणही प्रचंड वेगाने वाढताना दिसत आहे. मात्र कार खरेदीसारख्या महागड्या वस्तूंच्या खरेदीसाठीही ग्राहक आता इंटरनेटवरून रिसर्च करत असल्याचे सर्वेक्षणात आढळले असून असा रिसर्च करणार्‍यांचे प्रमाण ५० टक्क्यांवर गेले असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. गुगल इंक या जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट सर्च इंजिनच्या इंडियन आर्मतर्फे हे सर्वेक्षण केले गेले आहे. ग्राहक सर्वेक्षण करणार्‍या एसी नेल्सन कंपनीने हे काम केले आहे.

भारतात सध्या इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या १ कोटी २० लाखांपेक्षा अधिक असून भारताचा याबाबत चीन आणि अमेरिकेपाठोपाठ तिसरा क्रमांक आहे. गुगल इंडिया प्रा.लिमि.चे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन यांनी दिलेल्या माहितीनुसार कार खरेदी करू इच्छिणार्‍या ग्राहकांपैकी सुमारे ५४ टक्के ग्राहक डिलरकडे जाण्यापूर्वी इंटरनेट रिसर्च करतात. त्यात प्रामुख्याने कारच्या किंमती, कारसंबंधी येणारे रिव्ह्यू, तसेच टेस्ट ड्राईव्हसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे याचा समावेश असतो.हे ग्राहक ठराविक ब्रँडबाबत आग्रही नसतात असेही आढळले आहे. टेस्ट ड्राईव्हसाठी भरलेल्या विनंती अर्जाला चार तासांत उत्तर आले नाही तर हे ग्राहक लगेच नाराज होतात आणि त्यांचा संबंधित कार खरेदीचा उत्साह ओसरतो असेही या सर्वेक्षणात आढळले आहे. २०११ सालात इंटरनेट सर्च करणार्‍या ग्राहकांची संख्या तब्बल ७० टक्क्यांनी वाढली आहे असेही दिसून आले आहे.

टॉप टेन सर्च लिस्ट कारमध्ये २०११ सालात ह्युंडाईची इऑन, महिद्र अॅन्ड महिद्रची एक्सयूव्ही ५०० व होंडाची ब्रिओ या तीन कार पहिल्या तीन नंबरांवर आहेत.