पाच वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम दोन वर्षांतच पूर्ण करा – मुख्यमंत्री

मुंबई, दि. ६ – राज्यात आज निर्माण झालेल्या टंचाईग्रस्त परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाच वर्षांत १०० कोटी झाडे लावण्याचा राज्य शासनाने संकल्प केला आहे. परंतु हा संकल्प दोन वर्षांतच पूर्ण केल्यास एक महत्वाकांक्षी कार्यक्रम राज्यात राबविला जाऊन वनक्षेत्र वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सभागृहात संत तुकाराम वनग्राम राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री पतंगराव कदम, राज्यमंत्री भास्कर जाधव आदी उपस्थित होते.

पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असून इतर राज्यांपमाणे आपणही संयुक्त वनक्षेत्र विकास प्रकल्प राबविला तर पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यास मदत होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारने तयार केलेला वातावरणातील बदलाबाबतचा राष्ट्रीय कृती आराखडा राज्यातही राबविण्यात येणार असून, त्यामुळे वनक्षेत्र वाढण्यास मदत होईल. वन विभागाला आता सर्व सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात वनक्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केलाच पाहिजे.

वाघांची तस्करी रोखण्यासाठी कडक कायदे करण्याचा मानस व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कार्य काही ठिकाणी यशस्वी झाले आहे. ते इतरत्रही यशस्वी व्हावे, म्हणजे वनांपासून मिळणारे उत्पन्न अन्य गावांनाही मिळेल. असाच प्रयोग गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आला. त्यामुळे त्या गावाला यंदा कळकाचे एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आणि वनक्षेत्र राखण्यासही मदत झाली. असेच प्रयोग राज्यभर राबविल्यास वनक्षेत्र वाढण्यास मदत होईल.

राज्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी वैयक्तिक पातळीवर वृक्ष मित्र पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिक्षणात पर्यावरणाचे धडे असलेच पाहिजेत. पाणी आणि दुर्मिळ वनस्पती नष्ट होत चालल्या आहेत. वनक्षेत्र वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केलेच पाहिजे. संत तुकाराम महाराजांचा ’वृक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे’ हा अभंग अंगी बाणवलाच पाहिजे. राज्यातील वनक्षेत्र वाढविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. राज्यात ’ग्रीन टुरिझम’ योजना राबवावी म्हणजे पर्यटनाला चालना मिळेल.

वनमंत्री डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, या कार्यक्रमात वनसंरक्षणासाठी कार्य केलेल्या गावांचा आणि कर्मचार्‍यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येत आहे. राज्यात १७३ कि.मी. वनक्षेत्र वाढले असून ताडोबात वाघांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आपण पर्यावरणाचा नाश रोखण्यासाठी वनक्षेत्र वाढविणे गरजेचे आहे.

संत तुकाराम वनग्राम पुरस्कार योजनेंतर्गत २०१०-११ मध्ये गडचिरोली जिल्हयातील कोंढाळा ग्राम पंचायतीला १० लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला. अकोली, जिल्हा लातूरला पाच लाख आणि राळेगणसिद्धी, अहमदनगर व होराळे, रायगड यांना तीन लाखांचा पुरस्कार विभागून देण्यात आला. मराठवाडा प्रशासकीय विभागाकरिता असणारे प्रोत्साहनात्मक बक्षीस उस्मानाबाद जिल्ह्यातील नागेवाडीला मिळाले असून, हे बक्षीस १.५१ लाख रुपयांचे आहे.

Leave a Comment