खगोलप्रेमींनी अनुभवले शुक्राचे अधिक्रमण

मुंबई, दि. ६ – पृथ्वी, शुक्र आणि सूर्य एकाच रेषेत विशिष्ट अंतरावर आल्यामुळे झालेले शुक्राचे अधिक्रमण विविध ठिकाणच्या खगोलप्रेमींना बुधवारी अनुभवले. सूर्याच्या केशरी रंगाच्या पार्श्वभूमीवर शुक्राचा काळा ठिपका उठून दिसत असल्याचे खगोलप्रेमींना पाहावयास मिळाले.

शुक्राचे हे अधिक्रमण भारतीय वेळेनुसार पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी सुरू झाले. सकाळी ०७ वाजून ०१ मिनिटांनी या अधिक्रमणाची सर्वोच्च स्थिती होती. सकाळी १० वाजून १९ मिनिटांनी शुक्र या अधिक्रमणातून बाहेर पडला. शुक्राच्या अधिक्रमणाचा असा योग आता १०५ वर्षांनी म्हणजे ६ डिसेंबर २११७ रोजी येणार आहे.

शुक्र आणि सूर्याचे पहाटे होणारे मिलन पहाता यावे म्हणून विविध खगोल मंडळांनी व विज्ञान प्रसार संस्थांनी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक आदी ठिकाणी दुर्बिणींची सोय केली होती. पण राज्याच्या काही भागात ढगाळ हवामान असल्यामुळे अनेक खगोलप्रेमींना हा सोहळा अनुभवता आला नाही.

Leave a Comment