आय.टी.त वाणिज्य पदवीधर

आय. टी. विषयी सर्वकाळ एक मोठा गैरसमज पसरवला जातो की या क्षेत्रात करीयर करण्यासाठी आधी इंजिनिअरिंग पदवी घेणे गरजेचे आहे. आय. टी. व्यवसायात नेहमीच सॉफ्टवेअर इंजिनियर असा शब्द वापरला जात असल्याने तर या गैरसमजाला चांगलेच बळ मिळते. या क्षेत्रात करीयरच काय पण साधा प्रवेश मिळवायचा झाला तरी निदान गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री हा ग्रुप घेतलेला विज्ञान पदवीधर  असणे आवश्यकच असते. कारण आय. टी. म्हणजे ‘कॉम्युटर सायन्स.’ मग या क्षेत्रात सायन्स ग्रॅज्युएट लागणारच. हे नाही तरी  निदान बी. टेक. होणे तर गरजेचे आहेच. वाणिज्य आणि कला पदवीधरांचे इकडे काही कामच नाही. बी. कॉम. आणि बी. ए. झालेल्यांनी आय. टी. कडे फिरकूसुद्धा नये. प्रत्यक्षात हे सारे गैरसमज माहिती तंत्रज्ञाना विषयीच्या काही भ्रमांतून आणि  अज्ञानातून निर्माण झालेले असतात.

या क्षेत्रात कोणत्याही विद्याशाखेचा पदवीधर करीयर घडवू शकतो. काही मोठ्या आय.टी. कंपन्यांचे सीईओ चक्क वाणिज्य आणि कला शाखेचेही पदवीधर आहेत. मग हे गैरसमज निर्माण कसे झाले? या क्षेत्रातल्या कंपन्यांनी सुरुवातीच्या काळात देशातल्या हुशार लोकांची भरती सुरू केली तेव्हा त्यांना इंजिनियरिंगमध्येच हुशार मुले सापडली. इंजिनियरिंग नंतर त्यांना विज्ञान शाखेत अशी हुशार मुले मिळाली. आता मात्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात  माणसे कमी पडायला लागली आहेत आणि नव्या गुणवान लोकांची गरज जाणवायला लागली आहे. आता आय.टी. कंपन्यांनी आपला मोर्चा वाणिज्य पदवीधरांकडे वळवला आहे. विप्रो टेक्नालॉजीजने वेलोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीज या संस्थेच्या मदतीने दीड हजार सॉफ्टवेअर इंजिनिअर्स तयार करण्याचा कार्यक्रम आखला आहे. या अभ्यासक्रमांचा लाभ बायालॉजीकल ग्रुप घेतलेल्या विज्ञान पदवीधरांना आणि वाणिज्य पदवीधरांना घेता येईल असे विप्रोने जाहीर केले आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून तो पुरा करणार्‍यांना सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची पदव्युत्तर पदवी दिली जाईल. (मास्टर ऑफ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग) या अभ्यासक्रमाला होम सायन्सची पदवी धारण करणारेही प्रवेश घेऊ शकतील.

आजवर आय.टी. कंपन्यांनी मॅनपॉवरचा शोध घेताना आपल्याला बी. ग्रुप घेतलेले सायन्स ग्रॅज्युएटस आणि वाणिज्य पदवीधरातूनही योग्य ती माणसे मिळू शकतील असा विचारच केला नव्हता पण आता ही गोष्ट ध्यानात आली आहे. दरसाल अशा पदव्या घेऊन बाहेर पडणार्‍या ५ लाख पदवीधरांचा मोठा वर्ग या कंपन्यांनी उगाच दुर्लक्षित केला होता. आता माणसे कमी पडायला लागल्यावर, ती सारखी नोकर्‍या सोडून जायला लागल्यावर कंपन्यांना पर्यायाचा विचार करावा लागत आहे. संगणकाच्या क्षेत्रात अमुकच एक पदवीधर चालतो असे नाही. तर्कशुद्ध विचार करणारा साधा एस.एस.सी. झालेला विद्यार्थीही या क्षेत्रात नाव कमवू शकतो. आता अन्य पदवीधरांना संधी आहे असे लक्षात येऊन त्यांची भरती सुरू झाली की, आता आहेत त्या तंत्रज्ञांची किंमत कमी व्हायला लागेल की काय असेही बोलले जायला लागले आहे.   

Leave a Comment