भारतीय केळ्यांना पाकिस्तानातून मोठी मागणी

इस्लामाबाद दि.६- गेले दोन वर्षे पाकिस्तानातून भारतीय केळ्यांना असलेल्या मागणीत वाढच होत असून ही केळी पाकिस्तानात २०० रू. डझन भावाने विकली जात आहेत असे सांगण्यात आले आहे. पाकिस्तानचा सिंध प्रांत हा केळ्यांचे आगार म्हणून ओळखला जातो.मात्र गेली दोन वर्षे सततचे पूर आणि वातावरणात वाढलेला गारवा यामुळे येथे केळ्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी भारतातून केळ्यांची आयात केली जात आहे. सुरवातीला पंजाब प्रांतातूनच ही केळी निर्यात होत होती मात्र आता भारतातील अनेक राज्यातून केळी निर्यात केली जात आहे.

इस्लामाबाद भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय केळ्यांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. ही केळी मोठी, चवीला चांगली असल्याने त्यांना मागणीही चांगली आहे.गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील केळी उत्पादन ४० हजार टनांनी घटले आहे. भाजीपाला व फळ आयात निर्यात संघाचे अध्यक्ष वाहीद महमह यांच्या मते भारतातून द्राक्षे आणि आंबेही पाकिस्तानात येतात मात्र या दोन्हीपेक्षाही भारतीय केळ्यांना पाकिस्तानी लोकांची अधिक पसंती मिळते आहे. कराचीच्या बाजारात ही केळी दीडशे ते दोनशे रूपये डझन विकली जात असून पाकिस्तानी केळी ७० ते ८० रूपये डझनाने विकली जातात.

Leave a Comment