नवे वैमानिक घेण्याची एअर इंडियाची योजना – अजितसिंह

नवी दिल्ली, दि. ७ – एअर इंडिया व्यवस्थापन पुढील सहा महिन्यांत ९० वैमानिकांना भाडेतत्वावर सेवेत घेण्याची योजना आखत असून यातील काही वैमानिक आंतरराष्ट्रीय; तर काही देशांतर्गत विमानसेवेसाठी उपलब्ध केले जातील, अशी माहिती नागरी विमान वाहतूकमंत्री अजितसिंह यांनी बुधवारी येथे दिली. अनेक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची योजना आहे. तसेच अंतर्गत उड्डाणांसाठी आणखी काही वैमानिकांची सेवा घेण्याचाही विचार आहे, असे त्यांनी बुधवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले.

वैमानिकांच्या विद्यमान आंदोलनासंदर्भात बोलताना अजितसिंह म्हणाले की, आंदोलन करणार्‍या वैमानिकांची कामावर येण्याची इच्छा नाही असे दिसते. तसेच त्यांनी धर्माधिकारी अहवालही फेटाळून लावला आहे. वैमानिकांचे आंदोलन उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरविले असल्याने, वैमानिकांनी कामावर आले पाहिजे, अशी आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. आंदोलन करणार्‍या वैमानिकांनी कामगार संघटनेच्या नियमानुसार संपाची साधी नोटीसही दिलेली नाही. कोणाही वैमानिकास आकसाने वागविले जाणार नाही, असे आम्ही संसदेत स्पष्ट केले आहे. असे असूनही वैमानिकांची कामावर येण्याची इच्छा दिसत नाही. वैमानिकांची कामावर परतण्याची इच्छा असल्यास त्यांचे स्वागतच आहे. पण कोणत्याही प्रकारच्या पूर्वअटी न घालता, त्यांनी कामावर यायला हवे.

एअर इंडियाच्या वैमानिकांचे गेल्या एक महिन्याहून अधिक काळ आंदोलन चालू असून त्यावर अद्याप काही तोडगा निघालेला नाही. या आंदोलनामुळे एअर इंडियाला आपली अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. या आंदोलनाचा एअर इंडियाला प्रचंड प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. तसेच एअर इंडियाच्या विमानांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांचेही या आंदोलनामुळे प्रचंड हाल झाले आहेत.

Leave a Comment