स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष पथक

मुंबई, दि. ५ – स्त्री भ्रूण हत्येस प्रतिबंध करण्यासाठी राज्यभरात जिल्हास्तरावर विशेष पथके स्थापन करावीत. या विशेष पथकांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दररोज सायंकाळी शासनाला सादर करावा, असे आदेश मुख्य सचिव जयंतकुमार बॉंठिया यांनी सोमवारी दिले.

राज्यातील बीड, सोलापूर व लातूर जिल्ह्यांमध्ये नुकतेच मृत स्त्री भ्रूण आढळून आले. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्य सचिवांनी मंत्रालयात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, आरोग्य विभागाचे उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य तसेच महापालिकांमधील आरोग्य अधिकार्‍यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. त्यावेळी मुख्य सचिव बोलत होते.

मुख्य सचिव बॉंठिया म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात पोलीस, महसूल आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेली विशेष पथके तातडीने स्थापन करावी. त्यांच्या माध्यमातून सोनोग्राफी सेंटर्स, गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात यावी. प्रसवपूर्व गर्भलिंग निदान कायद्याची अंमलबजावणी आणि विशेष पथकांच्या कार्यवाहीवर विभागीय आयुक्तांनी नियंत्रण ठेवावे. शेजारील राज्यांतील जिल्हाधिकार्‍यांशी आपल्या राज्यातील जिल्हाधिकार्‍यांनी समन्वय ठेवून गर्भलिंगनिदान तपासणी आणि स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार घडू नयेत, यासाठी काळजी घेतली पाहिजे. अशा घटना आढळून आल्यास संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली पाहिजे. गर्भलिंगनिदान आणि स्त्री भ्रूण हत्या करण्यार्‍या डॉक्टरांवर पोलीस यंत्रणेने तात्काळ कठोर कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

Leave a Comment