ख्रिस गेलचा अखेर विंडिज संघात समावेश

बार्बाडोस, दि. ५ – जगातील बहुतेक प्रमुख गोलंदाजांना धडकी भरविणारा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याचा वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघात पुनर्प्रवेश झाला आहे. ब्रिटनविरूद्ध होणार्‍या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संधी देण्यात आली आहे. गेले १४ महिने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि गेल यांच्यात संघर्ष सुरू होता. तो या निमित्ताने संपुष्टात आल्याने क्रिकेट रसिकांमध्ये उत्साह आहे.

एका रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गेलने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या काही धोरणांवर जाहीर टीका केली होती. त्यामुळे त्याला राष्ट्रीय संघातून डच्चू देण्यात आला. मधल्या काळात बोर्डाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून त्याने संघात प्रवेश कऱण्याचे निकराचे प्रयत्न केले होते. पण त्याला यश मिळाले नव्हते. १६ जूनपासून इंग्लंडविरूद्ध होणार्‍या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान देण्याचा निर्णय क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.

स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेल्या गेलकडे एखादा सामना आपल्या संघासाठी एकहाती जिंकण्याची क्षमता आहे. अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून तसेच आयपीएल सारख्या स्पर्धांमधून त्याने आपली छाप उमटविली आहे. त्याचे चाहते उत्कंठतेने तो राष्ट्रीय संघात परतण्याची वाट पहात होते. विशेषतः विंडिजला गेल्या वर्षभरात अनेक दारूण पराभवांना सामोरे जावे लागले असताना गेलची उणीव जाणवत होती. अखेर दोन क्षेत्रीय पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. या चर्चेअंती गेलला राष्ट्रीय संघात स्थान देण्यास बोर्डाच्या पदाधिकार्‍यांनी हिरवा कंदिल दाखविला. क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे अध्यक्ष क्लाईड बट्स यांनी गेलच्या राष्ट्रीय संघातील पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त केला. गेलने स्वतःला सिद्ध केले असून, त्याच्या आगमनामुळे संघाचे मनोधैर्य वाढेल, असे बट्स म्हणाले.

वेस्ट इंडिजचा इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी संघ –
डेरेन सॅमी (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन्सन चार्ज्स, लेंडल सिमन्स, डॅरेन ब्राव्हो, किरॉन पोलार्ड, मारव्हन सॅम्युअल्स, कायेन ब्राव्हो, दिनेश रामदिन (यष्टीरक्षक), व्हायन स्मिथ, आंद्रे रसेल, टिनो बेस्ट, फिडेल एडवड्र्स, रवी चमपॉल आणि सुनिल नरीन.

Leave a Comment